

सातारा : पाटण तालुक्यातील सावरघर गावात १,५०० मेगावाॅट तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर उत्खनन व बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कामासाठी आवश्यक पर्यावरणीय मंजुरी आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या (एनबीडब्ल्यूएल) पूर्वपरवानग्या घेतल्या आहेत का, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, यासंदर्भात कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता, त्यांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितला.
महाराष्ट्र वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार यांना पत्र पाठवून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. सावरघर येथे प्रकल्पाशी संबंधित मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असून, या ठिकाणाचा पर्यावरणीय मंजुरीमध्ये समावेश आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
तारळी ओपन लूप पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला ११ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्र सरकारकडून पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली होती. या मंजुरीमध्ये पाटण तालुक्यातील निवाडे, तोंडोशी, काळंबे आणि जाळू या गावांमधील १५०.७४ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. मात्र, सावरघर गावाचा उल्लेख मंजुरीमध्ये नसल्याने तेथील सुरू असलेल्या कामांची वैधता तपासण्याची मागणी भाटे यांनी केली आहे.
प्रकल्पस्थळी तातडीने पाहणी करून उत्खननाचे प्रमाण, बांधकाम, वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि कामाचे नेमके ठिकाण यांचा अधिकृत पंचनामा करावा. आवश्यक वैधानिक परवानग्यांशिवाय काम सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रकल्प परिसर कोयना वन्यजीव अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या घोषित पर्यावरण संवेदनशील क्षेत्राशी संबंधित असल्याने वन्यजीव संरक्षणविषयक नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. आवश्यक असल्यास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची पूर्वमंजुरी घेतली आहे का, याचीही पडताळणी करावी. चौकशी निष्पक्ष उच्चस्तरीय यंत्रणेकडून करावी आणि तपास पूर्ण होईपर्यंत अनधिकृत उत्खनन व बांधकाम रोखण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.