
कराड: पाटण तालुक्यातील मालदन खेड्यापासून निघालेली वैष्णवी संजय काळे या जागतिक स्तरावर प्रसिद्ध कंपनी गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नियुक्त झाल्याने गावकऱ्यांमध्ये आणि तालुक्यात आनंद व अभिमानाची लाट उठली आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि प्रोत्साहनाच्या जोरावर पाटण तालुक्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचवल्याने गावकऱ्यांचा आणि तालुकावासीयांचा उर अभिमानाने भरला आहे.
वैष्णवी ही संजय व सुरेखा काळे यांची कन्या असून, हभप (कै.) बाबासाहेब ज्ञानदेव ऊर्फ बी.डी. काळे यांची नात, तसेच प्रा. यशवंत ऊर्फ वाय. बी. काळे यांची पुतणी आहे. वैष्णवीने मुंबईतील एसडीडीटी विद्यापीठातील उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली, तर अमेरिकेतील व्हिस्कॉन्सीन मेडिसीन विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स पदवी संपादन केली.
नुकतेच तिला कॅलिफोर्नियातील गुगल मुख्यालयात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नियुक्ती मिळाली. वैष्णवी ही त्यांच्या तीन मुलांमधील सर्वात मोठी असून, तिच्या बहीण वैभवी जॉर्जियामध्ये एमबीबीएस करत आहे, तर धाकटा भाऊ सिव्हिल इंजिनिअरिंग शिकत आहे.