

कराड : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाई तालुक्यातील सुरूर गावच्या हद्दीत शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू झाला, तर १३ वर्षीय मुलासह तिघे गंभीर जखमी झाले. चालकाला झोपेची डुलकी लागल्याने भरधाव कार सर्व्हिस रोडवरील दुभाजकाला धडकून दोन ते तीन वेळा पलटी झाली. हॉटेल आईसाहेबसमोर ही दुर्घटना घडली.
चिपळूण येथील कदम आणि पवार कुटुंबीय मुंबईहून चिपळूणकडे कारने प्रवास करीत होते. वैभव वामन कदम (४५) हे कार चालवत होते. सुरूर गावच्या हद्दीत कार आली असता चालकाला झोपेची डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार सर्व्हिस रोडवरील दुभाजकाला जोरदार धडकून महामार्गावर उलटली.
या अपघातात विजय धोंडू पवार (७०) आणि वैष्णवी वैभव कदम (४३) यांचा गंभीर दुखापतींमुळे मृत्यू झाला, तर चालक वैभव कदम, वैशाली विजय पवार (६२) आणि वेदांत वैभव कदम (१३) हे तिघे गंभीर जखमी झाले. वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांपैकी एका मृतदेहाचे कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर दुसऱ्याचे सातारा येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही मृतदेह चिपळूण येथे नेण्यात आले.