

कराड : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका म्हणजे सह्याद्री पर्वतरांगांतील डोंगर-दऱ्या आणि खोऱ्यांचा दुर्गम प्रदेश. या तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील वांग खोरे हे आंबा, फणस, काजू, चिक्कू यांसारख्या फळांसह जांभूळ, करवंद, तोरणे, डोंबले, आळू अशा रानमेव्यांसाठी ओळखले जाते. मात्र आता या परिसरात चक्क सफरचंदाची बागही बहरली असून हा प्रयोग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील सफरचंद बागांची महती सर्वश्रुत आहे. मात्र पाटण तालुक्यातील मानेवाडी येथील प्रगतशील शेतकरी आधिकराव माने आणि त्यांचे सुपुत्र विजय माने यांनी कुटुंबीयांच्या सहकार्याने माळरानाच्या शिवारात दहा गुंठ्यांत सफरचंदाची बाग फुलवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. काश्मीर आणि हिमाचलमध्ये पिकणारी सफरचंदे आता ढेबेवाडी विभागातील वांग खोऱ्याच्या मातीत वेगळीच मधुर चव घेऊन बाजारात दाखल होऊ लागली आहेत. त्यांच्या गोडवा आणि लज्जतीमुळे या प्रयोगाचे सातारा जिल्हाभर कौतुक होत आहे.
मानेवाडी हे विविध प्रयोगांमुळे देशभर प्रसिद्ध झालेले गाव आहे. याच गावातील आधिकराव माने यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले असले तरी त्यांनी शेतीत केलेले नवनवीन प्रयोग आणि संशोधन इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरत आहेत. सन १९९२ मध्ये पेरूच्या बागेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी आणि तज्ज्ञ प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण करणारा ठरला आहे. मुरमाड जमीन लागवडीखाली आणून त्यात विविध प्रयोग करण्याची त्यांची जिद्द उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार’सह विविध पुरस्कारांनी गौरविले आहे.
सध्या माने कुटुंबातील दुसरी पिढीही शेतीत नवनवीन प्रयोग करत आहे. विजय माने स्वतःचा औषध विक्री व्यवसाय सांभाळत वडिलांना शेतीत साथ देत आहेत. सुन पूजा माने, बंधू सुभाष माने आणि संपूर्ण कुटुंबाची एकजूट या प्रयोगाला बळ देत आहे.
माने यांनी आपल्या शेतात सफरचंदाची बाग उभारली असून हा केवळ पाटण तालुक्यातील नव्हे, तर सातारा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग मानला जात आहे. त्यांनी दोन वर्षे वयाची “हार्मोन ९९” जातीची १७० रोपे आणून आठ बाय दहा फुटांवर लागवड केली. लागवडीपूर्वी तीन बाय तीन आकाराचे खड्डे घेऊन त्यामध्ये बंधाऱ्यातील गाळ आणि शेणखत भरले. तसेच सुफला खत आणि बुरशीनाशक पावडरचा वापर करण्यात आला.
या प्रयोगासाठी काटेवाडी (ता. माण) येथील जालिंदर दडस यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच कालवडे (ता. कराड) येथील कृषी विज्ञान केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाचेही सहकार्य मिळाले. पाण्याचे योग्य नियोजन, सेंद्रिय खतांचा वापर, फवारण्या आणि सातत्यपूर्ण देखभाल यामुळे सध्या ही बाग रसदार सफरचंदांनी बहरली आहे.
या प्रकल्पासाठी आतापर्यंत सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च आला असला तरी खर्च वजा जाता दुप्पट उत्पन्न मिळेल, असा विश्वास माने कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. सध्या एका झाडाला सत्तर ते ऐंशी फळे लागली असून स्थानिक बाजारपेठेसह मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथूनही मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.
प्रयोग यशस्वी झाल्याचे समाधान
याबाबत सफरचंद बागमालक विजय माने म्हणाले, सफरचंद हे थंड प्रदेशातील फळ मानले जाते. आपल्या परिसरात त्याची लागवड करून उत्पादन घेणे हा एक धाडसी आणि वेगळा प्रयोग होता. तो यशस्वी झाल्याचे मोठे समाधान मिळत आहे. स्थानिक बाजारपेठेसह मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथूनही मागणी वाढत असून उत्पादनाला चांगला दर मिळत आहे,असे त्यांनी ‘नवशक्ति’शी बोलताना सांगितले.