Satara : परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना डिजिटल हजेरी सक्तीची; ऑनलाइन प्रणालीमुळे दांडी बहाद्दरांची झाली 'गोची'

‘सरकारी काम व सहा महिने थांब’ याची प्रचिती कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयांमध्ये गेल्यानंतर अनेकांना येत असते.
Satara : परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना डिजिटल हजेरी सक्तीची; ऑनलाइन प्रणालीमुळे दांडी बहाद्दरांची झाली 'गोची'
Published on

कराड : ‘सरकारी काम व सहा महिने थांब’ याची प्रचिती कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयांमध्ये गेल्यानंतर अनेकांना येत असते. हे झाले अधिकारी, कर्मचारी कार्यालयामध्ये हजर असतील तर आणि जर ते जागेवरतीच हजर नसतील तर ते केव्हा येतील व भेटतील हे साक्षात बह्मदेवही सांगू शकणार नाही. गलेलठ्ठ पगार असूनही केवळ वरिष्ठांची मर्जी सांभाळली की ऑफिसमध्ये ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच जणू स्थिती असते. मात्र सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यशनी नागराजन यांनी जिपसह जिपच्या आरोग्य विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांसाठी १०० टक्के डिजिटल हजेरी सुरू केली असून त्याची कडक अंमलबजावणी सुरू केल्याने प्रामाणिकपणा काम करणाऱ्यांना ‘न्याय’ मिळाला आहे तर दांडीबहाद्दरांची चांगलीच गोची झाली आहे. परिणामी सीईओ नागराजन यांच्या या उपक्रमाचे सर्वसामान्यांच्यातून स्वागत होत असून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेळेत उपस्थितीमुळे लोकांना वेगवेगळ्या सेवांचा लाभ मिळू लागला आहे.

मंत्र्यांपासून ते थेट मंत्रालयापर्यंत अनेकांचे लागेबांधे असल्याने त्यांच्या ऑफिसमधील येण्या-जाण्याच्या वेळांबाबत न बोललेलेच बरे, मात्र यावर रामबाण तोडगा म्हणून सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यशनी नागराजन यांनी जिपसह जिपच्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी १०० टक्के डिजिटल हजेरी सुरू केली असून त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेळेत उपस्थितीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागासह अन्य विभागही विविध योजनांमध्ये नेहमीच अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. तसेच शासनाच्याही बहुतांश नवीन योजना, मोहिमेची सुरुवात ही सातारा जिल्ह्यातूनच होत असते. प्रत्येक बाबतीत पुढे असणाऱ्या या जिल्ह्यात आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी एका बाबतीत साताऱ्याने अत्यंत समाधानकारक अशी कामगिरी केलेली आहे.

सातारा जिल्ह्यात कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी नोंद करण्यासाठी ॲप्लिकेशनचा वापर सुरू करण्यात आला. तसेच याअंतर्गत १ हजार ५१२ नियमित कर्मचारी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १ हजार १२० कर्मचाऱ्यांची नोंद प्रणालीत करण्यात आलेली आहे.

ऑनलाइन हजेरीनुसारच मासिक वेतन

सार्वजनिक आरोग्य विभाग संचालकांच्या आदेशानुसार आरोग्य विभागांतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी फेस रीडिंग तसेच बायोमेट्रिक पद्धतीने करण्याची प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करायची आहे. त्याचबरोबर एप्रिलपासूनचे मासिक वेतन ऑनलाइन दैनंदिन हजेरी अहवालानुसारच अदा करण्याबाबत सूचना होती.

सीईओ यशनी नागराजन यांचे अभिनंदन

दरम्यान,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या वरील निर्णयामुळे व त्याच्या कडक अंमलबजावणीमुळे जनतेला वेळेत अधिकारी, कर्मचारी भेटू लागले असून लोकांच्या सरकारी कामांना गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे सीईओ यशनी नागराजन यांचे अभिनंदन होत आहे तर जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in