सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला ओपन बारचे स्वरूप!

सध्या कार्यरत प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकांचे बऱ्याच बाबींकडे दुर्लक्ष झाले आहे
सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला ओपन बारचे स्वरूप!

कराड : साताऱ्यातील शासकीय क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाचा कारभार सातत्याने चांगल्या कामाऐवजी नको, त्या कारणांमुळे चर्चेत असतो. तरीही तेथील प्रशासनाचा नेहमीच तो मी नव्हेचचा पवित्र असतो. आता तर रुग्णालयाच्या गच्चीवर चक्क दारूच्या बाटल्या आढळल्यामुळे जिल्हा रुग्णालयात नक्की चाललंय काय ?असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे. सध्या कार्यरत प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकांचे बऱ्याच बाबींकडे दुर्लक्ष झाले आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील हे नाव स्वातंत्र्यपर्वातील अत्यंत तेजस्वी नाव असल्याने त्यांच्या नावाने जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्या नावाच्या अगदी विपरीत बेशिस्त कारभार सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका पाहणीमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या टेरेसवर चक्क दारूच्या बाटल्या आढळून आल्या. याच टेरेसच्या समोर सांख्यिकी विभाग असून, शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन याचे प्रमुख कार्यालयही आहे. असे असतानाही टेरेसवर चक्क दारूच्या बाटल्या आढळणे ही गोष्ट अत्यंत धक्कादायक आहे. जिल्हा रुग्णालयाचे वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी रुग्णालयाच्या धर्मशाळा विभागामध्ये मद्यपान करून जात असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या; मात्र आता चक्क टेरेसवरच दारूच्या बाटल्यांचे ढीग आढळल्याने प्रशासनाचे नक्की लक्ष आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे धडाकेबाज कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात; मात्र त्यांच्या अन्य कामांमुळे त्यांनी कधी या रुग्णालयाला भेट देऊन इथल्या कारभाराची माहिती घेतल्याचे ऐकिवात नाही. रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण हे गेल्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले असून, आता हा कार्यभार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील सोनवणे यांच्याकडे आहे; मात्र त्यांच्यापर्यंत या गोष्टी अद्याप पोहचलेल्या नाहीत.

मध्यंतरी व्हीलर चेअर कुलूपबंद अवस्थेत असल्याच्या संदर्भात लोकांनी तक्रारी केल्यानंतर त्यावर डॉ. सोनवणे यांनी मी प्रभारी आहे, जे कायमस्वरूपी येतील ते त्यावर उपाययोजना करतील, असे सरकारी छापाचे उत्तर तक्रारदारांना दिले होते; मात्र, जिल्हा रुग्णालयाचा ओपन टेरेस बार झाल्याचा विषय अत्यंत गंभीर आहे. शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख गणेश अहिवळे यांनी या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर रुग्णालय प्रशासन काय चोकशी करणार व दोषींवर काय कारवाई करणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in