जळगाव : उत्तर महाराष्ट्रात अखेर सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या जंगल पर्यटनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. खानदेशातील पहिली जंगल सफारी रावेर तालुक्यातील पाल अभयारण्यात सुरू झाली असून, याचा उद्घाटन सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला.
सातपुडा जंगल सफारी हा ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेच्या जपणुकीचा एक अभिनव उपक्रम आहे. यामार्फत स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत, तर पर्यटकांना सातपुड्याचा आत्मा अनुभवता येणार आहे. प्रत्येक कुटुंबाने येथे एकदा तरी अवश्य यावे. निसर्ग आपल्याला जगण्याचा श्वास शिकवतो, असे भावनिक आवाहन पालकमंत्री पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वन विभागातर्फे पालकमंत्र्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून सफारीबाबत सविस्तर माहिती घेतली. विशेष म्हणजे, या जंगल सफारीचे पहिले अधिकृत बुकिंग पालकमंत्र्यांनी स्वतः पाच हजार रुपये देऊन दोन गाड्यांसाठी केले. त्यानंतर दीड तास मंत्री, आमदार अमोल जावळे आणि अधिकारी यांच्यासोबत त्यांनी प्रत्यक्ष जंगल सफारीचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांनी केले, तर सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. सातपुडा जंगल सफारी ही उत्तर महाराष्ट्रातील पहिली जंगल सफारी असून, निसर्गप्रेमी, साहसी पर्यटक आणि फोटोग्राफरसाठी हे ठिकाण आकर्षण ठरणार आहे. पर्यटन, रोजगार आणि पर्यावरणाचा मेळ घालणाऱ्या या उपक्रमाचे लोण लवकरच संपूर्ण राज्यात पोहोचेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
सफारीची वैशिष्ट्ये
पाल अभयारण्यात ३,००० हेक्टर क्षेत्रावर सफारी
सुमारे १२.५ कोटींचा निधी खर्च
प्रवेशद्वार व अंतर्गत रस्त्यांचे काम
२७ किलोमीटरचा सफारी ट्रॅक
पाच विशेष सफारी वाहने
१८ प्रशिक्षित स्थानिक गाईड व चालक
सुशोभिकृत विश्रांतीस्थाने
सफारीसाठी साधारण अडीच ते तीन तास लागतात. पर्यटकांसाठी एका गाडीचे तिकीट २२,५०० आहे.
खानदेशातील पहिली जंगल सफारी उभारून पालकमंत्र्यांनी निसर्गप्रेमींसाठी एक मोठी देणगी दिली आहे. येथील जैवविविधता वाचवण्याची सामूहिक जबाबदारी आपली आहे. तसेच रावेर तालुक्यात 'डार्क स्काय पार्क सारख्या उपक्रमाची मागणीही त्यांनी केली.
अमोल जावळे, आमदार रावेर मतदारसंघ
पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षणे
लेक व्ह्यू पॉइंट : उंच टेकडीवरून तलावाचे आकर्षक दृश्य, पक्षी निरीक्षणाची आनंद घेता येणार
इको हट पॉइंट : बांबू व स्थानिक साहित्याने बनवलेले पर्यावरणपूरक विश्रांतीस्थानाची सुविधा
सनसेट पॉइंट : डोंगरमाथ्यावरून
मावळत्या सूर्याचे मोहक दृश्य; फोटोग्राफरसाठी उत्तम देखावा
वाघडोह भागः वाघ, बिबट्या व इतर वन्यप्राण्यांचे वास्तव्यासाठी प्रसिद्ध, वनविभागाच्या गाईड्ससोबत रोमांचक सफर
हा उपक्रम स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देणारा आहे. इथल्या मुलेमुलींना गाईडिंग, वाहनचालक म्हणून प्रशिक्षित करण्यात आले आहे. हा केवळ पर्यटन नव्हे, तर जैवविविधतेच्या संवर्धनासाठीचा दीर्घकालीन प्रकल्प आहे.
जमीर शेख, उपवनसंरक्षक