‘मविआ’ला जनतेची पसंती! सत्यपाल मलिक यांचा दावा, ‘मातोश्री’वर घेतली उद्धव ठाकरेंची भेट

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा आणि भाजपचा सुफडासाफ होणार आहे. तसेच हरयाणामध्ये काँग्रेस जवळपास ६० जागा जिंकेल, तर भाजप केवळ...
‘मविआ’ला जनतेची पसंती! सत्यपाल मलिक यांचा दावा, ‘मातोश्री’वर घेतली उद्धव ठाकरेंची भेट
Published on

मुंबई : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी बोलताना ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीला जनतेची पसंती असून आगामी विधानसभा निवडणुकीत ‘मविआ’च्या प्रचारसभांना आपण येणार आहोत.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा आणि भाजपचा सुफडासाफ होणार आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला माझा पाठिंबा असेल. हरयाणामध्ये काँग्रेस जवळपास ६० जागा जिंकेल, तर भाजप केवळ २० जागा जिंकेल. महाराष्ट्रातही ‘मविआ’ला जनता पसंती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२०१९ च्या पुलवामा हल्ल्यात ४० ‘सीआरपीएफ’ जवानांचा मृत्यू झाला. पुलवामा हल्ल्याची चौकशी व्हावी, अशी मागणी मी लावून धरली आहे. जवान शहीद होण्यामागे कोण जबाबदार आहे? हे देशासमोर आले पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप गैरवापर करत असून मतदान करताना लोकांनी या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, असे मलिक म्हणाले.

एकत्रित निवडणूक लढा!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांवर भाजपचा सुपडा साफ होईल. आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे महत्त्वाची भूमिका बजावतील. आजच्या भेटीत राज्यातील राजकारणावर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाल्याचे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत काही बदल करणे अपेक्षित असून ‘मविआ’ म्हणून एकत्रित निवडणुका लढा आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करा, असे आपण उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे मलिक यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in