

मुंबई : बोगस मतदार यादी, मतदान यादीत फेरफार यावरून विरोधकांकडून सातत्याने आरोपांची राळ उठवली जात आहे. मात्र, निवडणूक आयोगाकडून या आरोपांवर कोणतेही ठोस प्रत्युत्तर दिले जात नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या बोगस मतदानाविरोधात शनिवार, १ नोव्हेंबरला सर्व विरोधी पक्ष विराट मोर्चा काढणार आहेत.
या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी गुरुवारी मनसे अध्यक्षांसह मविआच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. लोकांना सत्य कळावे यासाठी ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात येणार असल्याचे मविआचे नेते शिवसेना आमदार अनिल परब यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीटहून पालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार असून, शेवटी प्रमुख नेते भाषण करतील, अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बनावट मतदार यादी आणि मतदार यादीत फेरफार केल्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीसोबतच मनसे आणि अन्य डावे पक्ष निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक झाले आहेत. या बोगस मतदारांसदर्भातील मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते शरद पवार, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वात शनिवारी, १ नोव्हेंबरला विरोधक मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेते, मनसे नेते आणि डाव्या पक्षातील नेतेमंडळींची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये रणनीती ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर अनिल परब, जितेंद्र आव्हाड, सचिन सावंत यांनी या मोर्चाची माहिती दिली.
निवडणुकीत बोगस मतदान आणि मतांची चोरी झाली आहे. हे सत्य लोकांसमोर यावे, यासाठी हा मोर्चा काढला जात आहे. मोर्चासाठी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली असून तो पूर्णपणे शांततेत पार पडेल. मोर्चाचे मार्ग, व्यवस्थापन आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यावर यावेळी चर्चा झाली असून मोर्चाच्या शिस्तबद्ध आयोजनासाठी पोलिसांशी समन्वय साधण्यात आला आहे. या मार्गाचे क्यूआर कोड माध्यमांना पाठवण्यात येणार आहेत. मतचोरी आणि निवडणुकीतील गैरव्यवहारांविरोधात पुढील आंदोलनाची दिशा या मोर्चात ठरवली जाणार असून या मोर्चात लाखो नागरिक, राजकीय कार्यकर्ते आणि मतदार सहभागी होतील, असा अंदाज अनिल परब यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या प्रेझेंटेशननंतर रोहित पवार यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा सातत्याने दबाव टाकत आहेत. परंतु चोर पकडला गेल्यावर चोरच चोऱ्या लपवण्याचा प्रयत्न करतो, तसाच हा प्रकार आहे. आताही रोहित पवार यांना घाबरवण्यासाठी सरकारकडून हा डाव रचल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. प्रेझेंटेशन पुन्हा करणार का, या प्रश्नावर आव्हाड म्हणाले की, प्रेझेंटेशन दिल्यावर फाशी देणार का? हा देश गांधी, नेहरू आणि भगतसिंह यांचा आहे. ते फाशीला घाबरले नाहीत, मग आम्ही का घाबरू? असे सांगत त्यांनी रोहित पवार हे निर्भयपणे निवडणूक आयोगाला आव्हान देत असल्याचे स्पष्ट केले.
जाब विचारण्यासाठी १ नोव्हेंबरचा मोर्चा - हर्षवर्धन सपकाळ
मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहे, हे काँग्रेस पक्षाने सर्वात आधी पुराव्यासह दाखवून दिले आहे. पण निवडणूक आयोग त्याची गंभीरपणे दखल घेत नाही. झोपलेल्या या निवडणूक आयोगाला जागे करण्यासाठी सर्व पक्षांनी १ नोव्हेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चात काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले. मुंबईत मोर्चाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या बैठकीला काही वैयक्तिक व घरगुती कामामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही, पण काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
