
काँग्रेसचे (Congress) बंडखोर आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. एका सभेमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे. ते निवडणुकीतील यशावर भाष्य करताना म्हणाले की, "अनेक लोक येतात आणि बोलतात की आम्ही तुम्हाला मदत केली, आमच्यामुळे तुम्ही निवडून आला आहात. पण, माझ्या विजयाचे खरे श्रेय माझ्या वडिलांच्या कामाला जाते. हे मी सभागृहातही मांडले होते." असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ते पुढे म्हणाले की, "इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की, की सक्सेस हॅज मेनी फादर्स. यशामागे अनेक 'बाप' असतात. माझ्यामुळे निवडून आला असे प्रत्येकजण म्हणतो. पण, माझ्या यशाचा एकच बाप आहे. तो म्हणजे माझ्या बापाने केलेले काम,” असे मत सत्यजीत तांबेंनी व्यक्त केले. तसेच, पिता-पुत्रांच्या कामाची तुलना होण्याचा महाराष्ट्राला, देशाला फार मोठा इतिहास आहे." असे विधानदेखील त्यांनी केले.
नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसने पदवीधर निवडणुकीसाठी सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, असे असतानाही स्वतः उभे न राहता त्यांनी आपला मुलगा सत्यजित तांबेला उमेदवारी दिली. एवढंच नव्हे तर सत्यजित तांबे हे अपेक्षा म्हणून उभे राहिले आणि निवडणूही आले. यादरम्यान, काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता.