
गेले अनेक दिवस नाशिक पदवीधर मतदारसंघात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. आधी काँग्रेस पक्षश्रेष्टींनीच निवडणूक दिलेल्या सुधीर तांबेंची माघार, त्यानंतर त्यांचाऐवजी त्यांचाच मुलगा सत्यजित तांबेंना निवडणूक लढवण्यासाठी उभे करणे. तेही अपक्ष म्हणून फॉर्म भरणे आणि याबाबत पक्षाला कोणतीही पूर्वकल्पना न देणे. यामुळे चर्चेत असलेल्या या घडामोडींनंतर आता काँग्रेसने सत्यजित तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांसमोर बोलताना माहिती दिली की, “सत्यजित तांबे यांना निलंबित करण्यात आले आहेत. आजचज ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सारखे पत्रकारांनी तांबे परिवाराचे काय झाले? असे प्रश्न विचारू नये. बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल विचाराल तर ते आमचे नेते आहेत. सध्या ते रुग्णालयात असून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत." असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आता पुढे सत्यजित तांबे काय भूमिका घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.