

पुणे : पुणे येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाची सुनावणी गुरुवारी पार पडली. या खटल्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पंतू सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी राहुल गांधी यांच्या वतीने अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी घेतली.
सात्यकी सावरकर यांनी उलटतपासणीत ऐतिहासिक दावे मान्य व कबूल केले. त्यांनी न्यायालयात कबूल केले की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काही पुस्तके इतरांच्या नावाने प्रकाशित केली होती, तसेच काही पुस्तके इतर लेखकांनी सावरकरांच्या नावाने प्रकाशित केली असल्याची शक्यता त्यांनी नाकारली नाही. सावरकरांच्या नावावर असलेल्या सर्व लिखाणाबाबत स्वतःला संपूर्ण माहिती नसल्याचेही त्यांनी मान्य केले.
सात्यकी सावरकरांनी न्यायालयात स्पष्टपणे कबूल केले की ‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी सरकारने बहाल केलेली नाही, तसेच ही पदवी जनतेकडून बहाल करण्यात आली असावी, परंतु त्याचा कोणताही अधिकृत किंवा कागदोपत्री पुरावा उपलब्ध नाही. ‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी सर्वप्रथम लेखक सदाशिव रानडे यांनी त्यांच्या चरित्रग्रंथामध्ये वापरली होती; रानडे यांनी ही पदवी त्यांच्या कल्पनेतून दिली होती किंवा कसे दिली, हे सात्यकी सावरकरांना माहीत नाही. खटल्याची सुनावणी तहकूब होऊन पुढील नियमित सुनावणी १३ एप्रिल रोजी होणार आहे.