
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज' या विभागाने पुन्हा एकदा देशातील नामांकित विभागांच्या यादीत नाव कोरले असून यंदाही देशात तिसरे व चौथे स्थान कायम ठेवले आहे.
आऊटलूक व इंडिया टुडे ही देशातील नामांकित मासिके असून दरवर्षी या मासिकांकडून देशपातळीवरील शिक्षणसंस्थांचे सर्वेक्षण केले जाते. त्यातून दहा दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शिक्षणसंस्था व विभागांची यादी जाहीर केली जाते. इंडिया टुडे च्या मागील तीनही वर्षांच्या सर्व्हेक्षणात 'मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज' विभाग टॉप टेन मास कमयुनिकेशन कॉलेजेस ' या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तर याच मासिकाच्या 'बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी' या क्रमवारीतही विभाग चौथ्या क्रमांकावर आहे.
'आऊटलूक ' या मासिकाच्या 'टॉप फाइव्ह गवर्नमेंट मास कम्युनिकशन कॉलेजेस' च्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिक्षण आणि संशोधनातील कामगिरी, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीचे पर्याय, पायाभूत सुविधा, प्रवेश प्रक्रिया, प्रशासकीय कामकाज आणि पोहोच आदी बाबींची पडताळणी करून ही क्रमवारी ठरवली आहे. यामध्ये एक हजार पैकी विभागाला ७१५ गुण प्राप्त झाले आहेत.
सार्वजनिक विद्यापीठात स्पर्धात्मक पातळीवर उतरून विभागाने स्वतःला सातत्याने सिद्ध केले आहे. विभागाच्या या यशात सर्व आजी माजी विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा वाटा आहे.