

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र सत्तेत असतानाच पाणीपुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. पालिकेच्या मासिक सभेत या प्रकरणावरून जोरदार खडाजंगी झाली. शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत सभात्याग केला. त्यानंतर पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले. या घडामोडींनंतर बांदेकर यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नगरपरिषदेत सत्तेची भागीदारी असलेल्या दोन मित्रपक्षांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. पाणीपुरवठा विभागातील कथित गैरव्यवहार, वस्तू नोंद व वापर रजिस्टर गायब झाल्याचा मुद्दा आणि या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी यामुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडेही केली आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेत भाजप आणि शिंदे सेना सत्तेत सहभागी असताना पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावरून निर्माण झालेला हा संघर्ष केवळ सभागृहापुरता मर्यादित राहणार की त्याचे पडसाद आगामी राजकीय निर्णयांमध्येही उमटणार, याकडे लक्ष लागले आहे.
एकमेकांच्या कारभारावर उपस्थित होणारे प्रश्न, अशा परिस्थितीमुळे दोन्ही मित्रपक्षांमधील समन्वयाची परीक्षा सुरू झाली आहे.
सभागृहात खडाजंगी
पाणीपुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून शिंदे सेनेचे नगरसेवक संजू परब यांनी आक्रमक भूमिका घेतली. सभापतींच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजप आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग करून आंदोलन सुरू केले. या घडामोडींमुळे सत्ताधारी पक्षांमधील अंतर्गत मतभेद सार्वजनिक झाले आहेत.
प्रतीक बांदेकर यांचा राजीनामा : या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांच्याकडे सभापतीपदाचा राजीनामा सादर केल्याचे जाहीर केले. आपली प्रतिमा मलिन केली जात असल्याची भूमिका त्यांनी मांडली. दुसरीकडे, पाणीपुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे आली आहे. मात्र, राजीनामा दिल्याने कथित गैरव्यवहाराचे आरोप सिद्ध झाले, असे मानता येणार नाही. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकेल.