पीकविमा योजनेत ५ हजार कोटींहून अधिकचा घोटाळा; आमदार धस यांचा दावा, मकोका लावून चौकशीची मागणी

पीकविमा योजनेत गैरप्रकार झाल्याचे खुद्द कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले होते आणि हा गैरप्रकार वेळीच उघडकीस आल्याने शासनाचे पैसे वाचले, असेही कोकाटेंनी सांगितले.
आमदार सुरेश धस
आमदार सुरेश धससोशल मीडिया
Published on

मुंबई : पीकविमा योजनेत गैरप्रकार झाल्याचे खुद्द कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले होते आणि हा गैरप्रकार वेळीच उघडकीस आल्याने शासनाचे पैसे वाचले, असेही कोकाटेंनी सांगितले. त्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना आव्हान देत हा घोटाळा ५ हजार कोटींहून अधिक असल्याचा दावा केला आहे. या मागे संघटित टोळी असल्याने संबंधितांवर मकोका लावून या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणीही धस यांनी केली आहे.

सीएससी केंद्र हे प्यादे आहेत. एकाच तालुक्यातील सीएससी केंद्र सगळीकडे कशी जातात, ठरावीक शेतकरी ८ जिल्ह्यात पीकविमा भरतो. माझे कृषीमंत्र्यांना आव्हान आहे. तुम्ही माझ्यासमोर चर्चेला या, माझी तयारी आहे, असे धस यांनी सांगितले.

परभणी जिल्ह्यात ४० हजार हेक्टर, बीड जिल्ह्यात ३९ हजार हेक्टरचा बोगस पीकविमा काढण्यात आला, ३५० कोटींचा घोटाळा झाला, असे कृषीमंत्री म्हणतात. परंतु तुम्ही आता चार्ज घेतला आहे. सर्व कागदपत्रे हवी असतील तर मी तुम्हाला देतो, ५ हजार कोटींवर हा घोटाळा गेला आहे, असे धस म्हणाले. दरम्यान, काही कंपन्या शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणत असताना मीच कृषी आयुक्तांना पत्र लिहिले होते, असे ते म्हणाले.

घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी!

आमदार सुरेश धस म्हणाले की, पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार ५ हजार कोटींच्यावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर मी त्यांना पत्र लिहिणार आहे. या घोटाळ्याची सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून संपूर्ण चौकशी करावी.

logo
marathi.freepressjournal.in