
पुणे : राज्यातील कारागृहांमध्ये रेशन, कॅन्टीन व विद्युत उपकरणांच्या खरेदीमध्ये सन २०२३ ते २०२५ या काळात जवळपास ५०० कोटी रुपयाहून अधिक रकमेचा घोटाळा झाला असून हा घोटाळा राज्यातील अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या सहभागाने झाला आहे. तत्कालीन अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या काळात हा घोटाळा झाल्याने त्यांची लाचलुचप विभागाच्या वतीने चौकशी करण्यात यावी तसेच पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
शेट्टी म्हणाले, राज्यातील कारागृहामध्ये कैद्याच्या पालनपोषणासाठी राज्य सरकार वर्षाकाठी शेकडो कोटी रुपये खर्च करत असते. रेशन व कॅन्टीनमधून कारागृहातील कैद्यासाठी दैनंदिन लागणारे गहू, तांदूळ, साखर, डाळी, दूध, फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा, चिकन -मटण, अंडी , बेकरी पदार्थ यासारखे दैनंदिन पदार्थ खरेदी करण्यात येतात. सेंट्रलाईज पद्धतीने खरेदी करत असताना साहित्याचे दर भरमसाठ वाढविलेले असून मंत्रालयीन व इतर उपहारगृहांमध्ये खरेदी करण्यात येणारे साहित्य व कारागृहातील खरेदी करण्यात आलेल्या साहित्यातील दरांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्याबरोबरच याच पद्धतीने विद्युत उपकरणांसह अन्य कारागृहात लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली जाते. या खरेदीमध्ये मोठी तफावत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले असून यामध्ये अधिकारी यांच्या संगनमताने घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे. याबरोबरच हा माल एक्सपायरी डेट संपलेला तसेच निकृष्ट दर्जाचा पुरवला जात असल्याचे निदर्शनास आले आहे, असा आरोप त्यांनी केला.
दिवाळीमध्ये कैद्यांना खरेदी केलेल्या फराळाचे दर तर गगनाला भिडणारे व बाजारातील नावाजलेले कंपन्यांचे होते. कैद्यांना मात्र स्थानिक बाजारातील निकृष्ट दर्जाचे लाडू, चिवडा व इतर फराळाचे साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. राज्यातील अनेक कारागृहात अन्न भेसळ विभागाने धाडी टाकल्या. यामध्ये रेशन व उपहारगृहातील निकृष्ट दर्जाच्या मालाचे नमुने अहवाल सादर केले. तरीही यामध्ये कारागृहास माल पुरवठा करणाऱया ठेकेदाकडून कोणतीच सुधारणा करण्यात आली नाही. याबाबत संबधित कारागृह अप्पर पोलिस महासंचालक यांना लेखी तक्रार करून सुद्धा संबधित भ्रष्ट लोकांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही, असेही त्यांनी नमूद केले.
खरेदी दरात मोठी तफावत
कारागृहामध्ये रेशन विभागात खरेदी करण्यात आलेल्या गहू, तांदूळ, साखर, मीठ, पोहे, गुळ याच्या खरेदीमध्ये प्रतिकिलो ११ रुपयापासून ते ३० रुपयापर्यंत अधिकच्या दराने खरेदी केले असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, चहा पावडर यासारख्या वस्तूमध्ये बाजारभावापेक्षा प्रतिकिलो ११० रुपये ते २५० रुपये प्रतिकिलो जादा दराने खरेदी करण्यात आले आहेत. कारागृहामध्ये रेशन व कॅन्टीन साहित्याबरोबरच जनरेटर, वाॉशिंग मशिन, ड्रोन कॅमेरा, प्रिंटर, कुलर यामधील खरेदी दरात मोठी तफावत दिसून आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे
एकीकडे राज्यातील तिजोरीत पैसे नाहीत तर दुसरीकडे अशी उधळपट्टी सुरू आहे. गेले तीन वर्षे ठिबक सिंचनसाठी पैसे नाहीत, विद्यार्थ्यांच्या तीन वर्षांच्या ३४०० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली.