प्रतिनिधी/मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या वेळापत्रकानुसार या जागांसाठी निवडणुका झाल्यास २७ फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार असून या जागांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे, तर राज्य विधिमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांची या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड करण्यात आल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले आहे.
या वेळापत्रकानुसार सहा जागांसाठी इच्छुक उमेदवारांनी विधान भवनात निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पूनम ढगे यांच्याकडे १५ फेब्रुवारीपर्यंत सार्वजनिक सुट्टी वगळता सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. या प्राप्त अर्जांची छाननी १६ फेब्रुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत केली जाणार असून, २० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर गरज भासल्यास २७ फेब्रुवारी रोजी निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.