'शाळा बंद' आंदोलनात राज्यातील केवळ एक टक्के शाळा बंद; राज्यातील १३ हजार शिक्षकच गैरहजर

टीईटी सक्ती व शिक्षक समायोजनाविरोधात काल राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलन केले. या आंदोलनाकडे शिक्षकांनी पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील केवळ एक टक्केच शाळा बंद ठेवण्यात आल्या. तर राज्यातील १३ हजार २१६ शिक्षक हे विनापरवानगी शाळेत अनुपस्थित राहिले.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : टीईटी सक्ती व शिक्षक समायोजनाविरोधात काल राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलन केले. या आंदोलनाकडे शिक्षकांनी पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील केवळ एक टक्केच शाळा बंद ठेवण्यात आल्या. तर राज्यातील १३ हजार २१६ शिक्षक हे विनापरवानगी शाळेत अनुपस्थित राहिले. हे प्रमाण एकूण शिक्षकांच्या तुलनेत फक्त ६ टक्के इतके आहे.

टीईटी सक्ती आणि शिक्षकांचे समायोजन या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटना व शिक्षक-शिक्षकेतर संघटनांनी काल शाळा बंद आंदोलन केले. राज्यातील शिक्षकांनी आज शाळा बंद आंदोलन जाहीर केले होते. त्यामुळे शिक्षण विभागाने एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा इशारा दिला होता. यानंतरही संघटनांनी ठाम भूमिका घेत आंदोलन केले. आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा शिक्षक संघटनांकडून करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात या आंदोल-नाकडे शिक्षकांनीच पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यामध्ये २४ हजार ४९० खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शाळा आहेत. या शाळांमध्ये २ लाख २४ हजार ३६६ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. आंदोलनामुळे फक्त २ हजार ५३९ शाळाच बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये ११ जिल्ह्यांमधील सर्व शाळा सुरू होत्या. त्याचप्रमाणे १३ हजार २१६ शिक्षक विनापरवानगी अनुपस्थित राहिले. एकूण शाळांच्या तुलनेत फक्त एक टक्का तर तर शिक्षकांचे प्रमाण सहा टक्के इतके होते.

११ जिल्ह्यांमधील एकही शाळा नव्हती बंद

राज्यातील ११ जिल्ह्यांमधील सर्व शाळा सुरू होत्या. यामध्ये मुंबई दक्षिण, ठाणे, पालघर, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, रत्नागिरी, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या शाळांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in