स्कूल व्हॅनमध्ये सुरक्षेला प्राधान्य; GPS, CCTV, पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजे बंधनकारक

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसह त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस सिस्टम, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, पॅनिक बटण बसवणे, आपत्कालीन दरवाजे बसवणे याची अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.‌
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसह त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस सिस्टम, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, पॅनिक बटण बसवणे, आपत्कालीन दरवाजे बसवणे याची अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.‌

शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्यात येत आहेत. याबाबतची अधिसूचना जारी होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

परिवहन विभागाने बोलावलेल्या पालक आणि बस संघटना प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनधिकृत वाहनांतून विद्यार्थी वाहतूक होत असल्याचा मुद्दा गाजला होता. देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीचा आधार घेऊन अद्यावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली (एआयएस-२०४) तयार केली आहे. चारचाकी १२+१ आसनापर्यंत विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनाला शालेय व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. ही वाहने बीएस-व्हीआय (BS-VI) या श्रेणीतील असणार आहेत. यात चालक ओळखपत्र, आपत्कालीन निर्गमन, वाहन प्रवेश, स्टोरेज रॅक यांच्या स्पष्टतेसह आसन रचना, अग्निशमन अलार्म यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचाही समावेश केला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली. केंद्राच्या मानकानुसार राज्य शासनाने नियमावली तयार करून व्हॅन सुरू करण्याबाबतची सूचनावली प्रसिद्ध केली आहे. त्याआधारे राज्य सरकारने हे धोरणात्मक पाऊल टाकले असून या संदर्भात अधिसूचना जारी होईल, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्रथम प्राधान्य आहे. सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी स्कूल व्हॅनला मंजुरी देण्यात येत आहे. नव्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी वाहतुकीचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना राज्य सरकारकडून परवाने देण्यात येतील. राज्यात अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी युक्त स्कूल व्हॅन धावती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

स्कूल व्हॅनमध्ये हे बंधनकारक

  • जीपीएस, सीसीटीव्ही आणि डॅशबोर्डवर स्क्रीन, अग्निशमन अलार्म प्रणाली, दरवाजा उघडा राहिल्यास अलार्म यंत्रणा, ताशी ४० वेगमर्यादेसह स्पीड गव्हर्नर, पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजे, स्कूल व्हॅनमध्ये लहान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पायरी

  • गाडीच्या छतावर शाळेचे नाव

logo
marathi.freepressjournal.in