राजकीय पक्षांकडून सभेसाठी मैदानाचा शोध

शहर परिसर येथे मोठी वानवा दिसून येत आहे. कारण राजकीय सभा घेण्यासाठी हाताच्या बौटावर मोजता येतील इतकीच मैदाने उरली आहेत. यामुळे आयत्यावेळी सभा घेण्यासाठी मैदान पाहताना राजकीय पक्षांची चांगलीच दमछाक होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
राजकीय पक्षांकडून सभेसाठी मैदानाचा शोध

अतुल जाधव / ठाणे

लोकसभा निवडणुकीचे जागावाटपाचे गुऱ्हाळ सर्वच राजकीय पक्षात सुरू असले तरी लवकरच राजकीय रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. मात्र या अंतर्गत असलेल्या सभा-मेळावे यासाठी लागणाऱ्या जागा, मैदाने यांची मात्र ठाणे महापालिका. शहर परिसर येथे मोठी वानवा दिसून येत आहे. कारण राजकीय सभा घेण्यासाठी हाताच्या बौटावर मोजता येतील इतकीच मैदाने उरली आहेत. यामुळे आयत्यावेळी सभा घेण्यासाठी मैदान पाहताना राजकीय पक्षांची चांगलीच दमछाक होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात सभेसाठी सर्वच राजकीय पक्षांची प्रथम पसंतीही गावदेवी मैदानाला असते. गावदेवी मैदानाचा राजकीय इतिहास देखील मोठा आहे. हमखास गर्दी जमणारे मैदान म्हणून या मैदानाची प्रसिद्ध आहे. आचार्य अत्रे, अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या दिग्गज वक्त्यांनी हे मैदान गाजवले असून जुन्याजाणत्या ठाणेकरांकडे या मैदानाच्या बऱ्याच आठवणी आहेत.

ठाण्याच्या गावदेवी मैदानातील निवडणूक प्रचारसभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे ठाणेकरांनी नाट्यगृहाची मागणी केली आणि त्यानंतर गडकरी रंगायतन उभे राहिले. ठाणे स्टेशन परिसरात असलेले गावदेवी मैदान हे शांतता क्षेत्रात मोडते. त्यामुळे येथील जाहीर सभांना परवानगी मिळेल का, याबद्दल राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

गावदेवी मैदानात भूमिगत पार्किंगची निर्मिती करण्यात आल्यानंतर मैदानाचा आकार अरुंद झाला असल्याची नागरिकांची तक्रार आहे. ठाणे शहरातील सेंट्रल जेलच्या समोर असलेले सेंट्रल मैदान निवडणुकीच्या सभेसाठी राजकीय पक्षांचे आवडते मैदान समजले जाते, परंतू हे मैदान फक्त खेळासाठी आरक्षित केल्याने राजकीय सभा घेण्यास परवानगी नाकारण्यात येत आहे

शिवसेनाप्रमुखांनी मतदारांसमोर साष्टांग दंडवत घातला तो सेंट्रल मैदानातील सभेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदीसुद्धा सेंट्रल मैदानात आले होते. शरद पवारांपासून राज ठाकरे आणि गोपिनाथ मुंडेंपासून विलासराव देशमुखांपर्यंत अनेकांच्या मुलूखमैदानी तोफा इथे धडाडल्या, मात्र ही दोन्ही मैदाने आता निवडणूक प्रचारसभांसाठी मिळणार नसल्याने राजकीय पक्षांची मोठी कोंडी झाली आहे.

मुख्य शहरात दुसरे मोठे मैदानच नसल्याने सभा घ्यायची कुठे, असा प्रश्न राजकीय पक्षाच्या नेत्यांना पडला आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियमचा पर्याय असला तरी या ठिकाणी अद्याप एकाही राजकीय पक्षाने सभा घेण्याचे धाडस दाखविलेले नाही. याशिवाय स्टेडियम राजकीय कार्यक्रमांसाठी न देण्याचा पालिकेचाच ठराव आहे. त्यामुळे तिथे सभा घेण्यास कुणीही उत्सुक नाही.

ठाण्यातील जांभळी नाका येथील शिवाजी मैदान राजकीय पक्षांना सभा घेण्यासाठी चांगला पर्याय असला तरी शिवाजी मैदान आकाराने छोटे असल्याने सभा घेण्यास या ठिकाणी मर्यादा आहेत ठाणे शहरातील बाळकुम परिसरात असलेले हायलेंडचे मैदानाचा पर्याय राजकीय पक्षांना उपलब्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१४ च्या निवडणूक प्रचाराची सभा या ठिकाणी घेण्यात आली होती त्याचप्रमाणे शरद पवार यांची सभा देखील यापूर्वी या ठिकाणीं घेण्यात आल्याने या मैदानावर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा असणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in