"हा सरकारच्या नाकर्तेपणाविरोधातील संताप", अमोल कोल्हेंच्या 'शेतकरी आक्रोश मोर्चा'चा दुसरा दिवस; असा आहे दिनक्रम

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीत दाबून टाकण्याचे काम केले जात आहे. शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढावा लागतो आहे, ही दुर्दैवाची बाब आहे असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.
"हा सरकारच्या नाकर्तेपणाविरोधातील संताप", 
अमोल कोल्हेंच्या 'शेतकरी आक्रोश मोर्चा'चा दुसरा दिवस; असा आहे दिनक्रम

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्ह्यात शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केल्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही खासदारांवर टीका केली होती. कोल्हे यांना तर थेट निवडणुकीत पाडण्याचे चॅलेंज दिले होते. यानंतर काल शिवनेरी किल्ल्यावरून 'शेतकरी आक्रोश मोर्चा'ला सुरुवात झाली. केंद्र, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीत दाबून टाकण्याचे काम केले जात आहे. शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढावा लागतो, ही दुर्दैवाची बाब आहे असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. शिवनेरीवरुन 27 डिसेंबर रोजी निघालेला हा मोर्चा 30 डिसेंबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. आज या मोर्चाचा दुसरा दिवस आहे.

शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. अजितदादांचा एवढा दरारा आहे त्यांनी केंद्र सरकारला बोलून कांदा निर्याद बंदी उठवावी. त्यांच्याकडे अर्थखाते असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ द्यावी. शेतकऱ्यांना रात्री वीज पुरवठा होत असल्याने पीकांना पाणी देण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी, अश्या मागण्या अमोल कोल्हे यांनी केल्या.

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, यासाठी आम्ही पवार साहेबांचे मार्गदर्शन घेतले आहे. ते देशाचे कृषीमंत्री होते तेव्हा कांद्यावर बंदी आणण्याची भाजपची भूमिका होती, असेही कोल्हे म्हणाले.

काल रात्री वेळी हा मोर्चा चाकणमध्ये दाखल झाला होता. मात्र, रात्रीच्या अंधारातही हातात मशाली घेऊन मोर्चाचा प्रवास सुरूच होता, "अन्यायाच्या अंधःकाराला भेदणारी न्यायाची मशाल हाती घेत आम्ही मार्गस्थ आहोत" हा संदेश देत हा प्रवास अखंडपणे सुरू असल्याचे कोल्हे म्हणाले.

"किल्ले शिवनेरी ते चाकण या प्रवासात मोर्चाला लाभलेला प्रतिसाद हा सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधातील संताप आहे, या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी हा मोर्चा आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) व काँग्रेस या तीनही घटक पक्षांतील कार्यकर्ते एकदिलाने हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहेत याचे मला विशेष कौतुक वाटते. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील साहेब यांनीही या संघर्षाच्या प्रवासात सामील होत सर्वांना बळ दिले. लोकनेते आदरणीय पवार साहेब, श्री. उद्धव ठाकरे साहेब व श्री. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात हा लढा आम्ही यशस्वी करू हा विश्वास वाटतो." असेही कोल्हे म्हणाले.

शेतकरी आक्रोश मोर्चाचा आजचा दिनक्रम

  • सकाळी 8:30 ते 9 च्या दरम्यान वढू (तुळापूर) येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार

  • केंदूर येथील श्रीराम चौकात सभा

  • पाबळ येथील लोणी चौकात कोपरा सभेचं आयोजन

  • त्यानंतर धामारी, मुखी, जातेगाव या ठिकाणी शेतकऱ्यांकडून स्वागत

  • दुपारी दीड वाजता शिक्रापूर येथे पाबळ चौक ते चाकण चौक अशी पदयात्रा

  • दुपारी दोन वाजता तळेगाव ढमढेरे येथील सावता माळी सभागृहात सभेचे आयोजन

  • त्यानंतर टाकळीभीमा, पारोडी, दहीवडी, उरळगाव मार्गे न्हावरा येथे हा मोर्चा येईल

  • न्हावरा येथे तळेगाव फाटा ते निर्विदरम्यान पदयात्रा आणि पुढे निर्वि, कोळगाव डोळस, कुरुळी, वडगाव रासाई मार्गे मांडवगण फराटा येथे आल्यानंतर या ठिकाणी सभा होईल

  • पुढे तांदळी, काष्टी मार्गे दौंड येथे दुसरा मुक्काम असेल.

अजितदादांचे ओपन चँलेंज

‘‘दोन खासदार पुणे जिल्ह्यात शेतकरी आक्रोश मोर्चा काढत आहेत. तसे हे चांगले आहे. परंतु, या दोन खासदारांपैकी एक खासदार साधा मतदारसंघातदेखील फिरत नव्हता. त्यावेळीच त्याने मला राजीनामा देणार, असे सांगितले होते. खरे तर या खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटील यांनी प्रयत्न केला. आता यांना चांगलाच उत्साह आला आहे. खरे तर ते एक उत्तम वक्ते आहेत, कलाकार आहेत. ते जनतेची उत्तम सेवा करतील, असे वाटले होते. परंतु, ते मतदारसंघात कधीच फिरकले नाहीत. आता त्यांना आक्रोश मोर्चा, पदयात्रा सूचत आहेत. निवडणुका जवळ आल्याने त्यांना आता हे सूचत आहे. परंतु ही लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. आता त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार निवडून आणणारच", असे आव्हान देत अजित पवार यांनी थेट कोल्हे यांच्या विरोधात दंड थोपटले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in