मुंबई : राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा रंगत असताना आता शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कपात केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या शिवसेना नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशांची सुरक्षा कमी करण्यात आल्याचे समजते. भाजप, राष्ट्रवादीसह शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून शिंदे विरुद्ध फडणवीस हा वाद आजही सुरूच असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात आलबेल नसल्याच्या बातम्या येत आहेत. हे दोन्ही पक्ष राज्यात सत्तेत असले तरी सरकार स्थापनेनंतर त्यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. मात्र आता त्यात कपात केल्याचे समजते. शिवसेना नेत्यांसोबतच भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आल्याचे समजते. ज्या शिवसेना नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
राज्यातील व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून ज्या नेत्यांच्या जीवाला धोका नाही त्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये भाजप, राष्ट्रवादीसह शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश आहे. भाजप नेते रवींद्र चव्हाण, प्रताप चिखलीकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान या निर्णयाने आमदारांनी नाराजीचा सूर आळवला आहे.
आता केवळ एकच सुरक्षारक्षक
या आधी शिंदेंच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येत होती. त्यामध्ये या आमदारांच्या पुढे-मागे पोलिसांच्या गाड्या असायच्या. तसेच या आमदारांच्या घराबाहेरही पोलीस सुरक्षा तैनात असायची. मात्र आता ही सर्व सुरक्षा आता कमी करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या नियमानुसार, शिंदेंच्या आमदारांच्या मागे पुढे असणाऱ्या पोलीस गाड्या कमी करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या घराबाहेरील पोलीसही कमी करण्यात येणार आहेत. शिंदेंच्या आमदारांसोबत आता एकच सुरक्षारक्षक असणार असल्याचे समजते. गृह खात्याच्या या निर्णयावर शिंदे सेनेच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.