मुंबई : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे शनिवारी माहीम येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. शालिनीताई पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
शालिनीताई पाटील या मंत्री आणि आमदार म्हणून एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी मराठा आरक्षणासाठीही
आवाज उठवला होता, मात्र त्यांना नेत्यांची आणि जनतेची साथ मिळाली नव्हती. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शालिनीताईंचा महाराष्ट्राच्या उल्लेख राजकारणातील 'वाघीण' असा केला होता. शालिनीताई या ए.आर अंतुलेच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री होत्या.
दोघांचेही दुसरे लग्न
शालिनीताई आणि वसंतदादा यांनी एकमेकांसोबत दुसरे लग्न केले होते. शालिनीताईंचे पहिले लग्न एका विद्वान न्यायाधीशासोबत झाले होते. मात्र, लग्नानंतर काही कालावधी उलटल्यानंतर त्यांचे निधन झाले.
ताई त्या काळात बॅरिस्टर झाल्या. त्यांना मंत्रालयात नोकरी मिळाली. मुख्यमंत्री वसंतदादांच्या त्या पीए झाल्या. वसंतदादांच्या पहिल्या पत्नी आजारी असायच्या. त्यामुळे शालिनीताईंसोबत लग्न करण्याचा विचार वसंतदादांच्या मनात आला. त्यानंतर या दोघांचे लग्न मुंबईत पार पडले. या विवाहाला मर्यादित लोक उपस्थित होते. यावरून दोघांनाही टीकेचा सामना करावा लागला. मात्र, दोघांनीही याकडे दुर्लक्ष करत जनतेची सेवा सुरू ठेवली.
शालिनीताई पाटील यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षाचा आणि चर्चेचा राहिला आहे. वसंतदादा पाटील यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाल्या. १९८० च्या दशकात त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रिपद भूषवले होते. १९८१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते, तसेच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून १९९९ ते २००९ या काळात त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.