ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अनंत भावे यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनचे प्रसिद्ध माजी वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे यांचे रविवारी निधन झाले. पुण्यातील ‘अथश्री’ या वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अनंत भावे यांचे निधन
@NCPArunLad
Published on

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनचे प्रसिद्ध माजी वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे यांचे रविवारी निधन झाले. पुण्यातील ‘अथश्री’ या वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मराठी बाल साहित्यात अनंत भावे यांचे मोठे योगदान राहिले आहे. वृत्तनिवेदकाला अतिशय मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या मोजक्या दिग्गजांमध्ये अनंत भावे यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल. अनंत भावे, प्रदीप भिडे यांसारख्या वृत्तनिवेदकांनी वृत्तवाहिन्यांवरचा सुरुवातीचा काळ गाजवला. धीरगंभीर आवाज, स्पष्ट शब्दोच्चार, चेहऱ्यावर मिश्किल हास्य आणि ‘दाढी’ ही अनंत भावे यांची वैशिष्ट्ये होती. अतिशय उत्तम आणि दर्जेदार वृत्तनिवेदक असलेले अनंत भावे हे सकस साहित्य लिहिणारे साहित्यिकही होते. स्तंभलेखक म्हणूनही त्यांनी नावलौकिक कमावला होता.

अनंत भावे यांनी अनेक बालवाङ्‌मय, बालकविता लिहिल्या आहेत. अग्गड हत्ती तग्गड बंब, अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी, अब्दुल गब्दुल, अश्शी सुट्टी सुरेख बाई!, उथ्थाप्पाचे उंदीर, कासव चाले हळूहळू, गरागरा गरागरा, गारगोटी झाली आकाशचांदणी, गिरकी घेऊन कबुतर सांगतंय, घसरगुंडी पसरगुंडी, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चला खाऊ पाणीपुरी, चिमणे चिमणे, चेंडूच्या फिरक्या असे विविध प्रसिद्ध बालवाङ्‌मय आणि बालकविता अनंत भावे यांनी लिहिल्या.

साहित्य अकादमीचा ‘बालसाहित्य’ पुरस्कार

पत्रकार, लेखक म्हणून कुणावरही टीका करताना ते कुठलीही तमा बाळगत नसत. ‘माणूस’ साप्ताहिकात ते स्तंभलेखन करायचे. मुंबईत १९८३ साली भरलेल्या विनोदी साहित्य संमेलनात भावे यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्रीय ललित स्तंभलेखनातील ‘विनोदाचे स्वरूप आणि परिणाम’ हा परिसंवाद झाला होता. दैनिक महानगरमधील त्यांचे ‘वडापाव’ सदर गाजले होते. साहित्य अकादमीतर्फे त्यांना ‘बालसाहित्याचा पुरस्कार’ जाहीर झाला होता. तसेच ‘उच्चकपाचक अंदाजपंचे’ हा त्यांचा कवितासंग्रह लोकप्रिय ठरला होता.

logo
marathi.freepressjournal.in