महामार्गांवर ट्रॉमा केअर सेंटरची वानवा ; मनुष्यबळ आणि देखभालीच्या खर्चामुळे सुविधांची कमतरता

राज्य सरकारने ट्रॉमा केअर सेंटरचे महत्त्व समजून घेणे आवश्यक असून, महामार्गालगत चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे
महामार्गांवर ट्रॉमा केअर सेंटरची वानवा ; मनुष्यबळ आणि देखभालीच्या खर्चामुळे सुविधांची कमतरता

अपघात झाला की सर्वप्रथम अपघातग्रस्तांना गरज असते ती तातडीच्या वैद्यकीय उपचारांची. त्यामुळे अपघातानंतरचा 'एक तास' मोलाचा असतो. याच काळात अपघातस्थळापासून नजीकच्या उत्तम हॉस्पिटलमध्ये उपचार मिळाल्यास अपघातग्रस्ताचे प्राण वाचतात. त्यासाठी नातेवाईकांना भरमसाठ खर्चाचा भार सोसावा लागतो; मात्र, राज्यातील महत्वाच्या महामार्गांवर अशा तातडीच्या वैद्यकीय सुविधांची कमतरता आहे.

राज्य सरकारने ट्रॉमा केअर सेंटरचे महत्त्व समजून घेणे आवश्यक असून, महामार्गालगत चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मनुष्यबळाची कमतरता आणि देखभालीचा खर्च यामुळे राज्यातील बहुतांश महामार्गांवर ट्रॉमा सेंटर्स नाहीत. कुठल्याही दुर्घटनेनंतर पहिल्या तासाभरात मिळणारे उपचार एखाद्याचे प्राण वाचवू शकतात.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आजपर्यंत राज्य शासनाकडून ६९ ट्रॉमा केअर सेंटर्सला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु त्यापैकी फक्त ६० कार्यरत आहेत. दोन बांधण्यात येत आहेत, तर उर्वरित ट्रॉमा केअर सेंटरसाठी जागा आणि निधी वाटप करण्यात आलेला नाही.

ट्रॉमा केअर सेंटर्स राज्य सरकारचे स्वत:चे हॉस्पिटल किंवा कोणतेही खासगी हॉस्पिटलशी जोडलेले असते. राज्यात अनेक महामार्ग गावांमधून आणि जिल्ह्यांमधून जातात आणि २०हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जवळपास प्रत्येक शहरात आता ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालय आहे. त्यामुळे अपघात घडल्यानंतर जखमींना जवळच्या खाजगी किंवा सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले जात आहे. त्यामुळे शासकीय ट्रॉमा केअर सेंटर असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना एकाच सेंटरवर सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार मिळणे शक्य होणार आहे. रुग्णाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. तसेच या अशा उपचारांकरिता प्रचंड खर्च येतो, याचा नक्कीच फायदा रुग्णांना मिळणार आहे.

अपघातग्रस्तांना तासाभरात उपचार मिळणे गरजेचे

दरम्यान, तज्ज्ञांनी असे मत व्यक्त केले आहे की, " कुठल्याही दुर्घटनेनंतर पहिल्या तासाभरात मिळणारे उपचार एखाद्याचे प्राण वाचवू शकतात. यालाच इंग्रजीत गोल्डन अवर असंही म्हणतात. गोल्डन अवरमध्ये एक-एक सेकंद महत्त्वाचा असतो. पण एक्सप्रेसवेवर अशा तातडीच्या वैद्यकीय सुविधांची कमी आहे आणि असलेल्या सुविधांची अनेक प्रवाशांना माहिती नसते. अशा अपघातांमध्ये अनेक कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेतआणि त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळत नसल्याने सरकारने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे."

ट्रॉमा केअर सेंटर म्हणजे?

प्रथम दर्जाच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये सगळ्या प्रकारच्या अपघातांवर एकाच छताखाली सर्व उपचार अपघातग्रस्तांना मिळणार आहे. या युनिटमध्ये न्यूरोसर्जन, इंटेन्सिव्हिस्ट, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिकी सर्जन, ऍनेस्थेसिस्ट, निवासी वैद्यकीय अधिकारी आणि कुशल परिचारिका या उपस्थित असतात. तसेच ऑपरेशन थिएटर आणि अतिदक्षता विभागात सर्व प्रकारची अत्याधुनिक उपकरणे, सोयीसुविधा उपलब्ध असतात. आपत्कालीन यंत्रणेसाठी लागणारी साधनसामग्री येथे उपलब्ध असते. रुग्ण दाखल झाल्यापासून त्याची प्रकृती स्थिर होईपर्यंतची सगळी काळजी या सेंटरमध्ये घेतली जाते.

ट्रॉमा केअर सेंटर फक्त कागदावरच

मंत्रालयातील आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, १९९७ पासून जवळपास १०८ ट्रॉमा केअर सेंटर्सना मान्यता देण्यात आली आहे; मात्र ट्रॉमा केअर सेंटर्स बांधण्यासाठी हा प्रकल्प २०१३ मध्ये सुरू करण्यात आला आणि नऊ वर्षांनंतर केवळ ६३ सुरू आहेत. १५ ट्रॉमा केअर सेंटर्सच्या बांधकामांना उशिरा होत आहे, तर ३० ट्रॉमा केअर सेंटर फक्त कागदावरच राहिली आहेत.

जे ट्रॉमा केअर सेंटर्स कार्यरत नाहीत, ते एकतर कर्मचारी किंवा जागा वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत. न्यूरोलॉजिस्ट, ऍनेस्थेसियोलॉजिस्ट आणि कार्डिओलॉजिस्ट आवश्यक असल्याने ट्रॉमा केअर सेंटरची देखभाल करणे कठीण आहे. शिवाय पुरेसे रुग्ण नसल्यामुळे डॉक्टर अशा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये काम करण्यास तयार नसतात.

- डॉ. कैलाश बाविस्कर, महाराष्ट्र आरोग्य सेवा उपसंचालक

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in