सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील पारस येथील बाबूजी महाराज संस्थान येथे रविवारी सायंकाळी साडेसात वाजता दीडशे वर्ष जुने कडुलिंबाचे झाड पत्र्याच्या सभामंडपावर पडून सात भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेत 1 जण गंभीर जखमी झाला असून 30 जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, झाड पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आणि जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्याचे निर्देश दिले.
बाबूजी महाराज संस्थानच्या दर्शनासाठी दर रविवारी भाविक येतात. या ठिकाणी रात्री 10 वाजता ‘दुःखनिवारण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या तयारीसाठी मंदिराशेजारील सभामंडपात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, सायंकाळी वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वारा सुरू झाला. या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंदिराशेजारील कडुलिंबाचे झाड सभामंडपावर पडले.