गडचिरोलीच्या सिरोंचा येथे गंभीर पूरपरिस्थिती ; शेकडो नागरिकांना काढलं बाहेर

गोदावरी आणि प्राणहिता नदीला तेलंगणातल्या धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
गडचिरोलीच्या सिरोंचा येथे गंभीर पूरपरिस्थिती ; शेकडो नागरिकांना काढलं बाहेर
Published on

शेजारच्या तेलंगणा राज्यात उद्भवलेली पूर परिस्थिती आणि तेथील धरणातून सोडण्यात आलेलं पाणी यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील नदी काठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे. गोदावरी आणि प्राणहिता नदीला तेलंगणातल्या धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मिना स्वत: वॉर रुममधून या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सिरोंचा येथे गोदावरी नदीने धोक्याची १०५ मीटरची पातळी ओलांडली असल्याने सिरोंचा मधील १७ गावांना दवंडी पिटवून सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. आतापर्यंत ३३४ नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यात आलं आहे. खबरदारी म्हणून सिरोंचा येते औषधे, रुग्णालय व निवास, भोजन व्यवस्थेसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १४ रस्ते बंद झाल्याची माहिती समोर आली असून अपातकालीन मदतीसाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन हेलिकॉप्टर्स देखील सज्ज ठेवली आहेत.

तेलंगणातील देखील काही शहरे पुराच्या पाण्याखाली गेली असून मोठ्या प्रमाणावर पाणी गोदावरी आणि प्राणहिता नदीत येत असल्याने उद्या सकाळपर्यंत नदीकाठवरील अनेक गावांमध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु केले असून नागिरकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, सिरोंचा तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना २८ व २९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in