हारून शेख/ लासलगांव
धरणांच्या नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून पुरेशा पाण्याअभावी शेतीसह पूरक उद्योगही अडचणीत आला आहे. गेल्या वर्षी झालेल्या अत्यअल्प पावसामुळे तर तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उष्णतेच्या प्रचंड लाटेमुळे जलस्तर घटल्याने नाशिक जिल्ह्यातील जलसाठा खालावला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्व २४ प्रकल्प मिळून केवळ १६.३७ % इतका जलसाठा शिल्लक राहिला आहे.
यावर्षी नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली होती. उन्हाच्या झळा वाढल्याने बहुतांश विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी, चाराटंचाईचा प्रश्नही गंभीर बनला आहे. तीव्र उन्हामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला असून पूरक जोडधंदेही अडचणीत आले आहे. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील ३४८ गावे आणि ८७२ वाड्या असे एकूण १२२० गाव, वाड्यांना ३७० टँकरमधून ८१४ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये ३५६ खासगी आणि शासकीय १४ टँकरचा समावेश आहे. टँकर भरण्यासाठी आतापर्यंत २०१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
सध्या बागलाण तालुक्यातील २४ गावे वाड्या वस्त्यांवर २३ टँकरद्वारे रोज पाणीपुरवठा केला जात आहे. ४४ खासगी विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तालुक्याती औंदानेपाडा, दोधनपाडा, वाडीचौल्हेर, वघानेपाडा, यात चार गावांना तर वर्षभर टँकरने कायमस्वरूपी पाणीपुरवठा करावा लागतो यासाठी सटाणा पंचायत समितीने २४ खासगी विहिरी अधिग्रहित केल्या असून दररोज २४ टँकरद्वारे ३७ फेऱ्या केल्या जातात.
सिन्नर तालुक्यातील १३ गावे व २५२ वाड्याना ४२ टँकरद्वारे १२२ फेऱ्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गावांची लोकसंख्या बघता हे टँकर तहान भागविण्यासाठी अपुरे पडत आहेत. तालुक्यातील पांगरी बुद्रुक, पांगरीखुर्द, देवपूर, सोनारी निऱ्हाळे, पिंपरवाडी, फर्दापूर, वडगाव, मिरगाव, सिन्नर, खोपडी बुद्रुक, रामपूर, डुबेरे, सुळेवाडी, या गावांना प्रामुख्याने पाणीटंचाईचा फटका बसत आहे. १३ गावांतील पाणी योजना पूर्णतः ठप्प झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त धरणे असलेल्या दिंडोरी तालुक्यात ओझरखेड, पालखेड, पुणेगाव, तिसगाव, वाघाडी, करजवण, ही सहा मोठी धरणे असूनही अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावे लागत आहे. नांदगाव तालुक्यात ६४ गावांना व २७६ वाड्या-वस्त्यांना १६१ फेऱ्याद्वारे ६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या योजनांच्या विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठल्याने हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.
मनमाड शहराला प्रामुख्याने पालखेड डावा कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. नांदगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माणिकपुंज धरणातही पुरेसा पाणीसाठा नाही. त्यामुळे शहरात वीस ते बावीस दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.
इगतपुरी, त्रंबकेश्वर, नाशिक, हे तालुके निसर्ग संपन्न परंतु गेल्या काही वर्षात सातत्याने वाढलेली वृक्षतोड डोंगर सपाटीकरण वाढते शहरीकरण या कारणांमुळे तापमान दिवसेंदिवस वाढू लागले असून विविध प्रकल्पांकरिता वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे उन्हाळ्यातील वाढती रखरख त्रासदायक ठरत आहे. मालेगावचे तापमान ४४ अंशापर्यंत पोहोचल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. काही गावांना एक तर काहींना दोन आणि मोठ्या गावांना टँकरच्या तीन फेऱ्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
पेठ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उंबरपाडा (सुरगाणे) अंतर्गत चिखली गावात गेल्या दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. चिखली गावाच्या बाजूला ग्रामपंचायतच्या दोन विहिरी आहेत मार्च महिन्यापासून कोरड्याठाक पडले आहेत. आसपासच्या आदिवासी महिला नदी पात्रात खोल खड्डे करून त्यामध्ये झिरपणाऱ्या पाझरवर पाण्याची टंचाईवर मात करत आहे. नाशिक जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहे, ती कामे तत्काळ पूर्ण करावी, असे सूचना देण्यात आल्या आहेत.
विहिरींनी तळ गाठल्याने हातपंप कोरडे
नाशिक जिल्ह्यात पावसाचे माहेरघर धरणांचा तालुका, तालुक्यात दहा ते पंधरा लहान-मोठे असूनही इगतपुरी पूर्व भागात पाण्यासाठी उन्हातान्हात महिलांना पायपीट करावी लागत आहे. तालुक्यातील पिंपळगाव मोर, बोरीचीवाडी, मायदरा धानोशी, कचरवाडी, ठोकळवाडी, तातळेवाडी, चौराईवाडी, टाकेद, अडसरे, बांबळेवाडी, सोनोशी, इंदोरे खडकेद, उंटवाडी, वासाळी, घोडेवाडी, बार शिंगवे, राहुल नगर या भागातील नागरिकांना जलस्त्रोत आटल्याने अनेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठल्याने हातपंप कोरडे पडले आहे, भीषण पाणीटंचाई जाणवत आहेत.
आराखडा तयार करण्याच्या सूचना
नाशिक जिल्ह्यातील पाणी आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता, पशुधन विकास अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे संयुक्त आढावा घेतली. या बैठकीत भीषण पाणीटंचाई असणाऱ्या तालुक्यांमध्ये गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना पाणीटंचाई व संभाव्य पाणीटंचाई विचारात घेऊन आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात ३७० टँकरसाठी १९५ विहिरींचे अधिग्रहण
तालुका गावे वाड्या टँकर
नांदगाव ६४ २७६ ६९
येवला ५८ ६० ५७
बागलाण ३५ १२ ४२
चांडवड २९ ९७ ३३
देवळा २५ ३७ ३३
इगतपुरी ८ २५ ७
मालेगाव ४१ ८७ ४९
पेठ १८ १३ १६
सिन्नर १३ २५२ ४२
सुरगाणा २९ ११ १७
त्र्यंबकेश्वर ४ - ४