पाच वाहनांच्या अपघातात तीन ठार; १४ जण गंभीर जखमी

शहापूर तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील गोठेघर उड्डाणपुलावर बुधवारच्या सुमारास भीषण अपघात झाला.
पाच वाहनांच्या अपघातात तीन ठार; १४ जण गंभीर जखमी
Published on

शहापूर : शहापूर तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील गोठेघर उड्डाणपुलावर बुधवारच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाले असून १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शहापुरातील उपजिल्हा रुग्णालयात, क्रिटल केअर रुग्णालय व उल्हासनगर, ठाणे येथील सेंटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठाणे- मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर शहराजवळील गोठेघर उड्डाणपुलावर पहाटे चारच्या सुमारास हा अपघाता झाला. शहापूर तालुक्यातील गोठेघरजवळ भरधाव वेगात असणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने त्या कंटेनरने समोर येणाऱ्या ट्रक, टेम्पो आणि बस इतर दोन वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात २ महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला.

१४ जखमींपैकी ८ जणांना ठाणे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर ६ जणांवर शहापूर येथे उपचार सुरू आहेत. या अपघातात काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या अपघातप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला.

मुलगी बचावली मात्र आई-वडिलांचा मृत्यू

शहापूर अपघातात मृत्युमुखी पडलेले पियुष पाटील हे बृहन्मुंबई महानगर पालिकेत नोकरीला होते. तर त्यांची पत्नी वृंदा यांना अलीकडेच अमळनेर येथे शिक्षिकेची नोकरी मिळाली होती. मुळचे अमळनेरचे असलेले पाटील दाम्पत्य गेल्या पाच वर्षांपासून बदलापूर पूर्वेकडील श्रीनिवास रेसिडेन्सी या इमारतीत कृतिका या पाच वर्षाच्या मुलीसह राहत होते. दोन महिन्यांपूर्वी अमळनेर येथे शिक्षिकेची नोकरी लागल्याने वृंदा बदलापूरला येऊन जाऊन होत्या. ९ जानेवारीला मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच हे दाम्पत्य मुलीसह अमळनेरला गेले होते. बुधवारी बदलापूरला परत येण्यासाठी पाटील दाम्पत्य मुलीसह बसने निघालेही होते. पण दुर्दैवाने घरी पोहचण्याआधीच त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.दरम्यान, पीयूष पाटील व वृंदा पाटील या दाम्पत्यावर अमळनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in