पाच वर्षांत टँकरवर १२ कोटी ९० लाख रुपये खर्च; २७ गावे, १०० पाड्यांना टँकर, तर ५ गावे, २७ पाडे टँकरच्या प्रतीक्षेत

धरणांचा तालुका म्हणून शहापूर तालुक्याकडे पाहिले जाते, परंतु याच तालुक्यामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गेल्या मागील पाच वर्षांमध्ये या तालुक्यात टँकरवर १२ कोटी ९० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.
पाच वर्षांत टँकरवर १२ कोटी ९० लाख रुपये खर्च; २७ गावे, १०० पाड्यांना टँकर, तर ५ गावे, २७ पाडे टँकरच्या प्रतीक्षेत
Published on

बी.डी.गायकवाड/ शहापूर

धरणांचा तालुका म्हणून शहापूर तालुक्याकडे पाहिले जाते, परंतु याच तालुक्यामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गेल्या मागील पाच वर्षांमध्ये या तालुक्यात टँकरवर १२ कोटी ९० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र गाव-पाड्यांची तहान काही भागेना आणि त्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे, अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. पाणी आमच्या उशाला, कोरड आमच्या घशाला अशी परिस्थिती तालुक्यातील जनतेची झाली आहे. भावली उंदचन योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.

अजूनही एप्रिल महिना संपलेला नाही, पावसाळा सुरू व्हायला अजून जवळपास दीड-दोन महिन्यांचा कालावधी आहे. मात्र आत्ताच शहापूर तालुक्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी गाव-पाड्यांची संख्या ही अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने पाणीटंचाईमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करत असताना मागील पाच वर्षांमध्ये १२ कोटी ९० लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. २७ गावे, १०० पाड्यांना आतापर्यंत टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असून पाच गावे, २७ पाडे अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्या शहापूरमध्ये गाव पाड्यांची संख्याही कमी होण्याऐवजी वाढतच असल्याची तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. भातसा, तानसा, वैतरणा ही धरणे असताना सुद्धा तालुक्यामधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

गाव-पाड्यांची संख्या वाढल्याने पाणीटंचाईत वाढ

तालुक्यात आजमितीस २७ गावे, १०० पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असून भिवंडीतील उपविभागीय अधिकाऱ्यांकडून दोन गावे व आठ वाड्यांना टँकरच्या मंजुरीचे आदेश मिळाले असून या गाव-पाड्यांची संख्याही ३२ गावे,तर पाडे १३८ अशी एकूण १७० झाली असून ३५ टँकरच्या माध्यमातून त्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. आणखी काही दिवसांत यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या प्रचंड उष्णतेची लाट सुरू आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणच्या विहिरी,पाण्याचे पाणवठे आटले आहेत.

ज्या गावांना पाणीटंचाई निर्माण झालेली आहे त्या ग्रामपंचायतींनी दिलेले सर्व प्रस्ताव हे उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले असून. मंजूर गाव-पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या आमच्याकडे एकही प्रस्ताव शिल्लक नाही. जे प्रस्ताव मंजूर होतील, त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल.

- विजया पांढरे, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग

पंचायत समिती शहापूर

logo
marathi.freepressjournal.in