शाहू महाराज हे गादीचे खरे वारसदार नाहीत! संजय मंडलिकांच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ
विशेष प्रतिनिधी/मुंबई
राजर्षी शाहू महाराजांची करवीरनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या राजघराण्याचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे खरे वारसदार नाहीत, तर ते दत्तक वारसदार आहेत. करवीरनगरीच्या गादीची खरी वारसदार ही जनताच असल्याचे खळबळजनक वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी केले आहे. या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक रणधुमाळी जोरात सुरू असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या मतदारसंघात काँग्रेसने छत्रपती शाहू महाराज यांना मैदानात उतरवले आहे, तर शिंदे गटाने विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध शिंदे गट अशी येथे लढत सुरू आहे. प्रचाराचा धडाका सुरू असतानाच गुरुवारी शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांनी थेट छत्रपती शाहू महाराज यांच्या वारसा हक्कावरच प्रश्न उपस्थित केला असून, ते खरे गादीचे वारस नाहीत तर ते दत्तक आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही आणि कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचा दावा त्यांनी केला. हे वादग्रस्त वक्तव्य त्यांना निवडणुकीत महागात पडू शकते, असे बोलले जात आहे. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या प्रचारसभेत त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी फडात कुस्ती रंगलेली असताना मल्लाला हातच लावायचा नाही, असे म्हणून कसे जमेल. त्याला थेट टांगच मारली पाहिजे, म्हणजे खरी कुस्ती होते. असे सांगत त्यांनी थेट कोल्हापूरच्या गादीच्या वारसदारावरच प्रश्न उपस्थित करीत गादीची खरी वारसदार जनताच असल्याचे सांगितले. त्यावरून मंडलिक यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यामुळे हे वादग्रस्त विधान संजय मंडलिक यांच्या अंगाशी येऊ शकते, अशी चर्चा आहे.
कोल्हापुरात गादीचा मान फार मोठा आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांचा कोल्हापुरात सन्मान राखला जातो. विशेष म्हणजे छत्रपती शाहू महाराजदेखील पुरोगामी विचाराचा वारसा सांभाळत नेहमीच समाजाला मार्गदर्शन करीत आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या गादीला कोल्हापूरकर खूप मानतात. परंतु, यावेळी ते काँग्रेस पक्षाकडून मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासाठी माजी पालक मंत्री सतेज पाटील यांची फौज आघाडीवर असून, संपूर्ण मतदारसंघ ते पिंजून काढत आहेत. दुसरीकडे संजय मंडलिक यांची फौजही कामाला लागली आहे. त्यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने आता त्यांनीही प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीविरुद्ध महायुतीच्या नेत्यांनी मतदारसंघात जोर लावला. परंतु, आता थेट संजय मंडलिक यांनीच छत्रपती शाहू महाराज यांच्यावर आक्षेप घेत ते येथील गादीचे खरे वारसदार नाहीत, असे म्हटल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. त्यांचे हे वक्तव्य त्यांच्या अंगाशी येऊ शकते, असेही बोलले जात आहे. तसेच महाविकास आघाडीलाही हा चांगलाच मुद्दा मिळाल्याने सतेज पाटील हे मंडलिकांना कोंडीत पकडल्याशिवाय राहणार नाहीत, असे मानले जातेय.
मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला
कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघ शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळाला आहे. कोल्हापुरात विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगलेत धैर्यशील माने आहेत. या दोन्ही ठिकाणी महायुतीसमोर मोठे आव्हान उभे केले गेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे ते स्थानिक नेते, प्रमुखांशी संवाद साधत आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्याशी संपर्क करून साथ देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या संवादाची क्लिप आता व्हायरल झाली आहे.
मंडलिकांनी माफी मागावी, आ. सतेज पाटील यांची मागणी
संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान करून कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा अपमान केला आहे. मंडलिक हे स्वत:च्या स्वार्थापोटी अशी वक्तव्ये करीत आहेत. परंतु कोल्हापूरकर हा अवमान सहन करणार नाहीत. त्यामुळे संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराजांची माफी मागावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.