शक्तिपीठ महामार्ग लादणार नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला राज्यातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनदेखील केले आहे.
शक्तिपीठ महामार्ग लादणार नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
एक्स @satejp
Published on

मुंबई : प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला राज्यातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनदेखील केले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत सरकारची भूमिका स्पष्ट केली. “राज्य सरकारला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे, पण तो लादायचा नाही,” असे त्यांनी सांगितले.

सरकार याप्रकरणी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढची पावले उचलणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. मुंबईतील आझाद मैदानावर शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांनी हा महामार्ग रद्दबातल करण्याची मागणी केली आहे. या आंदोलक शेतकऱ्यांची शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी भेट घेतली. यानंतर अंबादास दानवे यांनी विशेष उल्लेख म्हणून शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा विधान परिषदेत मांडला. यावेळी सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानात जमलेल्या शेतकऱ्यांना भेटीसाठी बोलावले पाहिजे, अशी मागणी केली. या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

मुख्यमंत्री म्हणाले की, “सरकारला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे. पण तो लादायचा नाही. याप्रकरणी सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. मी जेव्हा कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा, सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यासोबत तेथील शेतकरी कोल्हापूर विमानतळावर माझी प्रतीक्षा करत होते. शेतकरी या महामार्गाला विरोध करत असून त्यांच्या सह्याचे निवेदन त्यांनी मला दिले होते. ते या मार्गाला विरोध करत नव्हते. त्यांनी त्यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन आम्हाला दिले आहे. त्यातील एकही सही खोटी असेल तर त्यावर कारवाई केली जाईल.”

“प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचे चित्र बदलणार आहे. शेतकऱ्यांना हा महामार्ग हवा आहे. समृद्धी महामार्गामुळे १२ जिल्ह्यांतील जीवनमान बदलले. त्यानुसार या महामार्गामुळेही अनेकांचे जीवन बदलणार आहे. जसा या प्रकल्पाविरोधात आज मोर्चा आला, त्याहून तिप्पट गर्दी हा महामार्ग व्हावा, यासाठी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाला होईल. ज्या गावांमध्ये सभा झाल्या. त्या गावांतील शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला आहे. याप्रकरणी जमिनीच्या पाचपट भाव दिला आहे. त्यामुळे हा महामार्ग होण्यासाठी विरोधकांनीदेखील मदत करावी,” अशी भूमिका फडणवीस यांनी सभागृहात मांडली.

महामार्गाचा आग्रह सोडावा - सतेज पाटील

काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आझाद मैदानावरील आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर सभागृहात त्यांनी सरकारला या महामार्गाचा आग्रह सोडण्याची विनंती केली. “शक्तिपीठ महामार्गाद्वारे नागपूर रत्नागिरीला जोडले जाणार आहे. पण यापूर्वीच यासाठी एक मार्ग उपलब्ध आहे. सरकारने यासंबंधी थोडा सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. आज महाराष्ट्रातील शेतकरी आझाद मैदानावर जमले आहेत. त्यांची संख्या मोजकी असली तरी त्यातील ५-५० शेतकऱ्यांना बोलावून मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका समजावून घ्यावी,” असे सतेज पाटील म्हणाले.

महाराष्ट्रच्या हितासाठी शक्तिपीठ महत्त्वाचा - फडणवीस

सतेज पाटील यांच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “रस्त्यांचा विकास केल्यामुळे आपल्यालाच फायदा होणार आहे. शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. वाशीम सर्वात दुर्लक्षित भाग होता. परंतु ग्रीनफिल्ड रस्त्यामुळे तो आज सगळ्यात महत्त्वाचा भाग झाला आहे. नवीन ग्रीनफिल्डमुळे जास्तीत जास्त भाग जोडले जात आहेत. समृद्धी, शक्तिपीठ आणि कोकण महामार्ग आपण बनवणार आहोत. या तीन रस्त्यांसाठी विचार करून जाळे तयार केले आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी हा रस्ता काढला जात आहे.”

शक्तिपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव व लातूर या १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी आझाद मैदानावर धडक दिली. शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या पुढाकारातून काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. ‘शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द’ या घोषणांनी त्यांनी आझाद मैदान दणाणून सोडले.

शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार - अंबादास दानवे

शक्तिपीठ महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या आम्ही खंबीरपणे पाठीशी असल्याची ग्वाही विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दिली. ते म्हणाले की, “तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान कोल्हापूर येथील सभेत सदरील शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांचा विरोध असेल तर राज्य सरकार हा महामार्ग करणार नाही, असे आश्वासन दिले होते. आता महायुतीचे सरकार आल्यानंतर सरकारला निवडणुकीपूर्वी दिलेल्या आपल्या शब्दाचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना राज्य शासनाकडून हा महामार्ग केला जात आहे. राज्य शासन अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्ग करत असेल तर शेतकरी बांधवांच्या आम्ही पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

लातूरला ८ एप्रिलला मेळावा

शक्तिपीठ महामार्गाचा हा लढा पुढे कायम ठेवण्यासाठी येत्या ८ एप्रिलला लातूर येथे भव्य मेळावा घेण्याचा निर्णय या मोर्चात घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यात मेळावे, स्थानिक लोकप्रतिनिधी व मंत्री यांना जाब विचारण्यासाठी घरावर मोर्चे काढणार, सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून शेतात काळे झेंडे लावणार, असे निर्णय यावेळी घेण्यात आले.

शक्तिपीठ रद्द करा, शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर एल्गार

आमच्या घराची राखरांगोळी करून सरकार शक्तिपीठ महामार्गाचा घाट घालत असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्या पोराबाळांच्या भविष्याचा विचार करून सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा. अन्यथा मोजणी अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही, मोजणी अडवणारच, असा एल्गार १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावरील विराट मोर्चात केला.

logo
marathi.freepressjournal.in