
नागपूर : राज्यातील ५४० शिक्षकांची भ्रष्ट मार्गाने भरती झाली आहे, असा ठपका ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ठेवला आहे. सरकारी प्रक्रिया न राबवता शिक्षकांची भरती केल्याचे आढळले आहे. हा घोटाळा १०० कोटी रुपयांचा आहे, असेही एसआयटीने सांगितले.
‘शालार्थ’ हे राज्य सरकारचे मध्यवर्ती पोर्टल आहे. यात सरकारी अनुदानित शाळेच्या कर्मचाऱ्यांची माहिती त्यात असते. ६२२ शिक्षकांची नियुक्ती झाली. त्यातील केवळ ७५ शिक्षकांची नियुक्ती प्रक्रियेनुसार झाली. ५४७ शिक्षकांची नेमणूक बनावट आयडीने करण्यात आली. त्यासाठी २० ते ३० लाख रुपये घेण्यात आले, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष तपास पथकाच्या प्रभारी सुनीता मेश्राम म्हणाल्या
की, शिक्षण विभागातील उपसंचालकांव्यतिरिक्त, तपास शिक्षण अधिकारी आणि शिक्षकांवर लक्ष आहे.