दुबेला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ! मराठी अस्मितेशी तोडजोड नाही - पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा पुनरुच्चार

कोणत्याही राज्यातील आमदार, खासदार येऊन मराठी माणसांवर वाटेल ते बोलतो, हे आम्ही सहन करणार नाही. याविरोधात शिवसेना म्हणून आम्ही पहिल्यांदा आवाज उठवला होता. भाजपनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे खासदार निशिकांत दुबे मुंबईत आल्यावर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देऊ, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
दुबेला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ! मराठी अस्मितेशी तोडजोड नाही - पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा पुनरुच्चार
Published on

कराड : कोणत्याही राज्यातील आमदार, खासदार येऊन मराठी माणसांवर वाटेल ते बोलतो, हे आम्ही सहन करणार नाही. याविरोधात शिवसेना म्हणून आम्ही पहिल्यांदा आवाज उठवला होता. भाजपनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे खासदार निशिकांत दुबे मुंबईत आल्यावर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देऊ, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

येथील शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मराठी भाषेवरून 'पटक पटक कर मारेंगे' असे वक्तव्य करणाऱ्या खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याने शिवसैनिक जागा झाला नाही का? या माध्यमांच्या प्रश्नावर ते बोलत होते.

मंत्री देसाई म्हणाले, खासदार दुबे यांच्या वक्तव्याविरुद्ध पहिल्यांदा शिवसेनेने आवाज उठवला आहे. यावर पहिली माझीच प्रतिक्रिया होती. महाराष्ट्रातील मराठी अस्मितेशी शिवसेना कधीच तोडजोड करणार नाही. खासदार दुबेला मुंबईत तर येऊ द्या, शिवसेना स्टाईलने त्याला उत्तर देऊ, असा पुनरुचारही त्यांनी यावेळी केला.

मंत्री संजय शिरसाट यांच्या घरात पैशांची बॅग सापडली असल्याच्या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, संजय राऊत यांच्या मनात जे आहे, तेच त्यांना दिसते. मंत्री संजय शिरसाट हे दौऱ्यावरून आले असता, त्यांच्यासोबत कपड्यांची बॅग होती. मग त्या बॅगेत पैसे आहेत का काय? हे संजय राऊत यांनी जाऊन बघितले होते का? असा सवाल करत त्यांच्या या वक्तव्याला काही अर्थ नाही, त्यांच्या मनात जे आहे तेच त्यांना दिसत असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.

दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने आगामी निवडणुकांवर काय परिणाम होईल? या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, ते दोघे मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेले आहेत. याला कोणतेही राजकीय स्वरूप नव्हते. राज ठाकरे यांनीही मनसेच्या सैनिकांना त्यांच्या कोणत्याही वक्तव्यावर प्रतिक्रिया न देण्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या या सभेला कोणतेही राजकीय स्वरूप नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाटणमध्ये आता विरोधकच राहिला नाही. सत्यजित पाटकर यांच्या पक्षप्रवेशामुळे महायुतीची ताकद वाढली आहे? या प्रश्नावर विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, पाटण विधानसभा मतदारसंघातही आम्ही महायुती म्हणून निवडणुका लढणार आहोत. पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील. या प्रश्नी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी बोललो असून सर्व परिस्थिती त्यांच्या कानी घातली आहे. त्यांनीही मला समाधानकारक उत्तर दिले आहे. त्यामुळे मी निर्धास्त असल्याचे मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

महायुती म्हणून एकत्र लढणार

तसेच अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य केले आहे? या प्रश्नावर ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना स्वबळावर लढायची तयारी ठेवा, असे सांगितले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत महायुती म्हणून आम्ही सर्व एकत्र लढणार आहोत. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते बसून त्याबाबतची दिशा ठरवतील. तसेच जिल्ह्यातील सर्व आठही आमदारांना बोलावून त्यांच्या स्थानिक पातळीवरील परिस्थितीबाबत चर्चा करून यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील. ते सांगतील त्यानुसार आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पैशांची बॅग घेऊन दौऱ्यावर कुणी जातो का?

ते म्हणाले, याबाबत संजय शिरसाट यांच्याशी मी स्वतः बोललो असता शिरसाट म्हणाले, मी दौऱ्यावरून आलो असता, आमच्या शिपायाने माझ्या कपड्यांची बॅग तिथे आणून ठेवली. यावर कोण काय टीका करते, याला काही अर्थ नसल्याचे त्यांनी म्हटल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले. कोणता माणूस पैशांची बॅग घेऊन दौऱ्यावर जातो का? अशा प्रतिप्रश्न करत राऊत बोलतात आणि चॅनलवाले ते दाखवतात, अशी खोचक टिपणीही देसाई यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in