अहिल्यानगर : शनिशिंगणापूर संस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी त्यांच्या निवासस्थानी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून शनिशिंगणापूर संस्थान विविध मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे.
महिनाभरापूर्वी ११४ मुस्लिम कर्मचारी घेतल्यामुळे संस्थानच्या विश्वस्त मंडळावर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना काढण्यात आले. त्यानंतर देवस्थानचे बनावट ॲप्स तयार करून पैशांची अफरातफर केल्याचा आरोपदेखील झाला होता. या प्रकरणात सध्या चौकशी सुरू आहे.
नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली? याबाबत निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, विश्वस्त मंडळाने केलेल्या अनियमिततेबाबत ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला असून, याबाबत चौकशी सुरू असतानाच शेटे यांनी आत्महत्या केल्याने या प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नितीन शेटे हे आमदार शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. ते संस्थानमध्ये उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. मात्र, अनियमितता उघड झाल्यानंतर हे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्यामुळे शेटे यांच्या आत्महत्येसंदर्भात शनी शिंगणापूर परिसरात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
सध्या पोलिसांनी शेटे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला त्या अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पोलिसांनी अद्याप या घटनेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.