
अहिल्यानगर : जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानने आपल्या सेवेतील १६७ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. यात ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी नुकतीच या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा इशारा दिला होता. या संघटनांच्या दबावामुळे देवस्थानने ही कारवाई केल्याचा आरोप केला जात आहे.
श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर मंदिरात ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी मंदिराच्या पवित्र चौथऱ्यावर जाऊन ग्रिल बसवले होते. तसेच तेथील स्वच्छता व रंगरंगोटीही केली होती. हिंदुत्ववादी संघटनांनी त्यास तीव्र आक्षेप घेत या कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. तसेच याप्रकरणी १४ जून रोजी मंदिराबाहेर मोर्चाचा इशारा दिला होता. त्यानंतर मंदिराच्या विश्वस्त मंडळाने ट्रस्टमध्ये ११४ मुस्लिम कर्मचारी काम करतात हे मान्य केले. पण त्याचवेळी एकाही मुस्लिम कर्मचाऱ्याची नियुक्ती मंदिराच्या मुख्य चौथऱ्यावर किंवा गर्भगृहात करण्यात न आल्याचे स्पष्ट केले होते.
हे कर्मचारी शेती विभाग, कचरा व्यवस्थापन व शिक्षणाशी संबंधित कामांमध्ये कार्यरत आहेत. ९९ कर्मचारी मागील ५ महिन्यांपासून नोकरीवर अनुपस्थित आहेत. त्यामुळे त्यांचा पगार बंद करण्यात आला आहे. उर्वरित १५ कर्मचारी अनेक वर्षांपासून ट्रस्टला आपली सेवा देत आहेत. यातील काहींचा अनुभव २० वर्षांहून अधिकचा आहे, असे विश्वस्त मंडळाने म्हटले होते.
नीतेश राणे यांचा हिंदू संघटनांच्या मागणीला पाठिंबा
राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी गुरुवारी हिंदू संघटनांनी मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीची केलेली मागणी योग्यच असल्याचे विधान केले होते. हिंदू संघटनांनी केलेली मागणी योग्यच आहे. हाजी अली आणि अजमेर दर्ग्यात असे कृत्य कुणी करेल का? असे कृत्य फक्त आपल्या हिंदू धार्मिक स्थळांसोबतच का केले जाते? कोणतीही हिंदू व्यक्ती कोणत्याही मुस्लिम धार्मिक स्थळात काम करताना दिसली तर हे लोक त्या व्यक्तीला नक्कीच सोडणार नाहीत. परंतु, ज्या प्रकारे आपल्या हिंदू धार्मिक स्थळांच्या प्रतिष्ठेशी सतत छेडछाड केली जात आहे, ते आपण आता कोणत्याही किमतीत स्वीकारू शकत नाही. कोणत्याही मुस्लिम संस्थेत तुम्हाला कोणताही हिंदू काम करताना दिसणार नाही, असे ते म्हणाले होते.