शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन

त्यांच्या पार्थिवाला सोमवारी सायंकाळी ५ वाजता परमहंसी गंगा आश्रम येथे समाधी दिली जाईल

ज्योतिर्मठ बद्रिनाथ व द्वारका शारदापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे रविवारी निधन झाले. मध्य प्रदेशातील नरसिंहपूरच्या झोतेश्वर परमहंसी गंगा आश्रमात रविवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९८ वर्षांचे होते. स्वरूपानंद सरस्वती यांना हिंदू धर्मातील सर्वात मोठे धर्मगुरू मानले जाते. त्यांच्या पार्थिवाला सोमवारी सायंकाळी ५ वाजता परमहंसी गंगा आश्रम येथे समाधी दिली जाईल.

शंकराचार्य गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. त्यांनी गेल्या महिन्यात ३ तारखेलाच आपला ९८वा वाढदिवस साजरा केला होता. ते द्वारकेच्या शारदापीठ व ज्योतिर्मठ बद्रिनाथचे शंकराचार्य होते. शंकराचार्यांनी राम मंदिरासाठी प्रदीर्घ कायदेशीर लढा दिला. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग घेतला होता. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील दिघोरी गावातील ब्राह्मण कुटुंबात झाला होता. आई-वडिलांनी त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय ठेवले होते. त्यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी घराबाहेर पडून धर्मयात्रा सुरू केली. त्यानंतर उत्तर प्रदेशातील काशीला जाऊन त्यांनी ब्रह्मलीन श्री स्वामी करपात्री महाराज वेद-वेदांग, शास्त्रांचे शिक्षण घेतले. १९४२मध्ये वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी ते क्रांतिकारी साधू म्हणून नावारूपास आले होते. त्यावेळी देशावर ब्रिटिशांचे राज्य असताना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्यामुळे त्यांनी वाराणसीत तुरुंगवास भोगला. स्वामी स्वरूपानंद १९५०मध्ये दंडी संन्यासी बनले. त्यांनी ज्योतिर्मठपीठाचे ब्रह्मलीन शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून दंड संन्यासाची दीक्षा घेतली. तेव्हापासून ते स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणून ओळखले जाऊ लागले. १९८१मध्ये त्यांना शंकराचार्याची उपाधी मिळाली. ते स्वामी करपात्री महाराजांचा राजकीय पक्ष रामराज्य परिषदेचे अध्यक्षही होते. शंकराचार्य सरस्वतींनी राम जन्मभूमी न्यासाच्या मुद्द्यावरून विहिंप व भाजपवर टीका केली होती. “अयोध्येतील मंदिराच्या नावाने भाजप-विहिंप आपले कार्यालय थाटण्याच्या प्रयत्नात आहे, हे आम्हाला मान्य नाही. हिंदूंमध्ये शंकराचार्य सर्वोच्च असतात. हिंदूंचे सर्वोच्च न्यायालय आम्हीच आहोत. मंदिराचे एक धार्मिक स्वरूप असले पाहिजे; पण हे लोक त्याला राजकीय रूप देण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही हे खपवून घेणार नाही,” असे शंकराचार्य म्हणाले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in