राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या नेत्यांची बंद दाराआड बैठक; शरद पवार व अजित पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना खतपाणी

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकांआधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या नेत्यांची बंद दाराआड बैठक झाल्याने या चर्चेला खतपाणी मिळाले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर (एआय)आधारित साखर प्रकल्पावरील उच्चस्तरीय बैठक रविवारी वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झाली. या बैठकीत ऊस उत्पादन वाढवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरावर सखोल चर्चा झाली. मात्र, ही बैठक दोन्ही राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीमुळे चर्चेचा विषय बनली आहे.

पवार कुटुंबीय एकत्र येण्यावर अनेकांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पवार अनेकदा एकत्र आले आहेत. यावर अजित पवार यांनी आम्ही दोघे अनेक संस्थांमध्ये पदाधिकारी आहोत, विकासकामांकरिता एकत्र बैठकीत भेटत असतो, असे सांगितले आहे. पण त्यांच्या एकत्रित उपस्थितीने दोघांमध्ये नव्याने संवाद सुरू होतोय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याचदरम्यान, राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या बैठकीला औद्योगिकदृष्ट्या जितके महत्त्व आहे, तितकेच ती राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची मानली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in