विधानसभेआधी दोघांनी १६० जागांची गॅरंटी दिली; शरद पवार यांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपांचे जोरदार समर्थन केले. विधानसभा निवडणुकीआधी मला दिल्लीत दोन माणसे भेटली होती, ती १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होती, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केल्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
विधानसभेआधी दोघांनी १६० जागांची गॅरंटी दिली; शरद पवार यांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
Photo : ANI
Published on

नागपूर : एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचा गंभीर आरोप करत कुठल्या ठिकाणी घोटाळा झाला, याची सविस्तर माहिती सांगितली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपांचे जोरदार समर्थन केले. विधानसभा निवडणुकीआधी मला दिल्लीत दोन माणसे भेटली होती, ती १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होती, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केल्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

“विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झाल्या, तेव्हा दिल्लीत मला दोन लोक भेटायला आले होते. त्यांची नावे व पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. आम्ही तुम्हाला २८८ पैकी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. पण त्यावेळी माझ्या मनात निवडणूक आयोगाविषयी कोणतीही शंका नव्हती. त्यामुळे मी असे लोक भेटतच असतात, म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली. त्या लोकांनी आपले म्हणणे राहुल गांधी यांच्यापुढे मांडले. लोकशाहीवर विश्वास असल्याने आम्ही दोघांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. जनतेच्या दरबारात जाऊन मते मागण्याची भूमिका आम्ही पसंत केली. पण गुरुवारी दिल्लीत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात अतिशय कष्ट करून सफल अभ्यास करून मतचोरीची मांडणी करण्यात आली," असे शरद पवार यांनी नागपूरात पत्रकार परिषदेत सांगितले.

उद्धव ठाकरेंच्या आसनव्यवस्थेवरूनही स्पष्टीकरण

राहुल गांधी यांनी सादरीकरण केले, त्यावेळी उद्धव ठाकरे कुठे बसले होते, यावरून वाद सुरू झाला आहे. तिथे 'पॉवर पॉइंट' सादरीकरण होते. आपण चित्रपट पाहण्यासाठी जसे मागच्या सीटवर बसतो, तसे आम्ही तिथे मागच्या बाजूला बसलो. आमच्या शेजारी कर्नाटकचे मुख्यमंत्रीही बसले होते. आम्ही मुद्दाम दूर बसलो. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे कुठे बसले? हा विषय विनाकारण उपस्थित करण्यात आला. त्याचे राजकारण करणे अयोग्य आहे, असे स्पष्टीकरणही शरद पवार यांनी दिले.

माजी निवडणूक आयुक्तांचाही पाठिंबा

मतचोरीच्या मुद्द्यावर आता राहुल गांधी यांना माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी एकप्रकारे पाठिंबा दर्शवाला आहे. "बंगळुरूमधील कथित बोगस मतदारांबाबत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची निवडणूक आयोगाने चौकशी करायला हवी. त्यासाठी आयोगाने कोणत्याही तक्रारीची वाट न पाहता तपास सुरू करायला हवा. मी मुख्य निवडणूक आयुक्त असताना, कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केल्यास आम्ही तत्काळ स्वतःहून तपास सुरू करत होतो आणि जनतेसमोर सत्य ठेवत होतो. अशा प्रकरणांत आम्ही पक्षांकडून आधी तक्रार मागत नव्हतो," असेही रावत यांनी सांगितले.

शरद पवारांची अवस्था राहुल गांधींसारखी झाली - फडणवीस

आजवर शरद पवारांनी कधीच ईव्हीएमवर शंका घेतली नव्हती. मग आता अचानक मतदान प्रक्रियेतील त्रुटींची आठवण का झाली? राहुल गांधींच्या भेटीनंतरच हे सगळे का आठवले? कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तरी आपल्या देशासारखी पारदर्शक निवडणूक कुठेही होत नाही, हे सर्वांना माहिती आहे. राहुल गांधी जसे रोज सलीम-जावेदच्या स्क्रिप्ट सारख्या काल्पनिक कहाण्या सांगतात, तशीच अवस्था आता शरद पवारांची तर झालेली नाही ना? अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी नव्हे, तर आयोगाने उत्तर द्यावे

आमचा आक्षेप निवडणूक आयोगावर आहे, त्यामुळे उत्तरही आयोगाने द्यावे. निवडणूक आयोगावर आक्षेप घेतल्यानंतर भाजप किंवा मुख्यमंत्र्यांनी आपले मत मांडायला पुढे येण्याची गरज नाही. आम्हाला उत्तर निवडणूक आयोगाकडून हवे आहे, इतर कुणाकडूनही नाही. आमची माहिती चुकीची असेल तर ते देशाला सांगितले पाहिजे. पण नसेल तर जे काही सत्य आहे ते पुढे आले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्षपणे सुनावले.

logo
marathi.freepressjournal.in