
पुणे : राज्यात १९७० मध्ये घडलेल्या राजकीय सत्तांतराची चर्चा अलीकडेही होत असते. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडल्यावरून शरद पवार यांच्यावर कायम टीका होत असते. पण हे सरकार का पाडले, याची कबुली राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पुण्यात दिली. वसंतदादा हे आमचे नेते होते. पण ते इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि तरुणांचा काँग्रेसला विरोध होता. त्यामुळे आम्ही वसंतदादांचे सरकार पाडले, अशी कबुली त्यांनी दिली.
“आम्ही स्वर्णसिंग काँग्रेसमध्ये होतो. यशवंतराव चव्हाण साहेबदेखील आमच्यासोबत होते. निवडणुकीनंतर कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. इंदिरा काँग्रेस आणि आम्हा स्वर्णसिंग काँग्रेसच्या जागा मिळून आम्ही एकत्र आलो आणि वसंतदादांना मुख्यमंत्री केले. मात्र आमचा, विशेषतः तरुणांचा, इंदिरा काँग्रेसवर राग होता. वसंतदादांचे सरकार घालवल्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. त्या १० वर्षांनंतर आम्ही परत एकत्र आलो. पण मुख्यमंत्री कोणाला बनवायचे? याबाबत चर्चा झाली. तेव्हा वसंतदादांनी कोणताही राग मनात न ठेवता, माझ्याकडे नेतृत्व सोपवायचा निर्णय घेतला,” असे शरद पवार यांनी सांगितले.
“वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, आदिक, निलंगेकर यांच्यासारख्या नेत्यांनी महाराष्ट्रात नेतृत्वाची भक्कम फळी तयार केली. यामुळेच महाराष्ट्र राज्य देशात एक सक्षम राज्य म्हणून ओळखले गेले. आजही जर देशाचा चेहरा बदलायचा असेल, तर गांधी-नेहरूंच्या विचारांची नव्याने मांडणी झाली पाहिजे. पूर्वी राजकारण मोठ्या मनाने केले जायचे. भूतकाळ विसरून एकत्र येण्याची तयारी होती. आज मात्र संसदच सत्ताधाऱ्यांकडून बंद पाडली जाते. ही लोकशाहीची घोर विटंबना आहे. ते चित्र बदलण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दांत शरद पवार यांनी पूर्वीच्या आणि आताच्या राजकारणाचे चित्र जनतेसमोर उभे केले.
म्हणूनच महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला!
यशवंतराव चव्हाण यांचे भाषण म्हणजे एक पर्वणीच असायची. एखाद्या विषयावर मंत्रमुग्ध व्हावे, अशा प्रकारे विचार हे यशवंतराव चव्हाण मांडायचे. पक्षाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांचेही मार्गदर्शन आम्हाला लाभले. वसंतदादाचे आम्हाला मार्गदर्शन असायचे. ही मोठी माणसे आहेत. त्यांचे अंत:करण फार मोठे होते. वर्षानुवर्षे महाराष्ट्र राज्य चालवण्याची ताकद आणि दृष्टी असलेल्या नेतृत्वाची फळी या लोकांनी उभी केली. त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा बदलला, असेही शरद पवार यांनी नमूद केले.