ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल; घशाचा संसर्ग, खोकला व तापाचा त्रास

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोमवारी दुपारी पुण्यातील रुबी हॉल क्लीनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना घशाचा संसर्ग, खोकला आणि ताप असा त्रास जाणवत होता.
ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल; घशाचा संसर्ग, खोकला व तापाचा त्रास
ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल; घशाचा संसर्ग, खोकला व तापाचा त्रास
Published on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोमवारी दुपारी पुण्यातील रुबी हॉल क्लीनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना घशाचा संसर्ग, खोकला आणि ताप असा त्रास जाणवत होता.

बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी असतानाच त्यांची प्रकृती बिघडली होती, तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अधिक सविस्तर वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी त्यांना पुण्यात हलवण्यात आले आहे. सोमवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांची तातडीने तपासणी केली व उपचार सुरू केले आहेत.

पवार यांची प्रकृती सध्या पूर्णपणे स्थिर आहे. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी आणि हृदयाचे ठोके सामान्य असून त्यांना व्हेंटिलेटर किंवा कृत्रिम ऑक्सिजनची कोणतीही गरज भासलेली नाही, असे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. अभिजीत लोढा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी पार्थ पवार व जय पवार हेही उपस्थित होते.

अतिधावपळीमुळे प्रकृतीत बिघाड

गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिधावपळीमुळे आणि शारीरिक कष्टामुळे (फिजिकल एक्झर्शन) त्यांच्या छातीत थोडा कफ जमा झाला आहे, ज्यामुळे त्यांना श्वसनास किंचित त्रास आणि खोकला जाणवत होता. सध्या ते रुग्णालयातील एका खासगी खोलीत विश्रांती घेत असून त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्याची गरज पडलेली नाही. रक्ताच्या आणि इतर आवश्यक चाचण्यांचे अहवाल दोन ते तीन तासांत अपेक्षित असून, त्यानंतर उपचारात काही बदल करायचे असल्यास निर्णय घेतला जाईल, असे डॉ. लोढा यांनी नमूद केले.

शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे रुग्णालयात उपस्थित आहेत. सुप्रिया सुळे आणि पक्ष कार्यकर्त्यांनी समर्थकांना रुग्णालयाबाहेर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून इतर रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही आणि रुग्णालयातील नियमांचे पालन होईल. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना त्यांच्या खासगी वाहनाने मुंबईला नेले जाण्याची शक्यता आहे.

कौटुंबिक दुःखद घटना आणि आपल्या पुतण्याचे, म्हणजेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरही शरद पवार सार्वजनिक कार्यात सक्रिय होते. या काळात त्यांनी सातत्याने लोकांशी संपर्क ठेवला आणि विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती, ज्यामुळे त्यांना थकवा जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही काळजी करण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in