बारामतीत पवारांची मोर्चेबांधणी; जुन्याजाणत्या नेत्यांच्या साथीने अजित पवारांचा वारू रोखणार?

बारामतीत पवारांची मोर्चेबांधणी; जुन्याजाणत्या नेत्यांच्या साथीने अजित पवारांचा वारू रोखणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार घराण्यातही दोन गट पडले आणि थेट पुतणे अजित पवार यांनी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह मिळवून त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला आणि आता...
Published on

विशेष प्रतिनिधी/मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार घराण्यातही दोन गट पडले आणि थेट पुतणे अजित पवार यांनी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह मिळवून त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला आणि आता त्यांच्यासमोरच आव्हान उभे केले आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ देशात चर्चेचा विषय बनला आहे. कारण खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर विरोधी पक्षाने नव्हे तर भावानेच आव्हान उभे करण्यासाठी चंग बांधला आहे. त्यासाठी पत्नी सुनेत्रा पवार यांनाच मैदानात उतरविण्याची योजना आखली आहे. परंतु हा डाव उलथवून टाकण्यासाठी शरद पवार यांनीही आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात जुन्याजाणत्या नेत्यांना सोबत घेतानाच, जातीय समीकरणे जुळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, रासपचे महादेव जानकर यांनाही सोबत घेण्याची त्यांची योजना आहे. तशी ऑफर शरद पवारांनी जानकर यांना दिल्याचे समजते.

आजपर्यंतच्या काळात भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी बारामती लोकसभेसाठी प्रचंड ताकद लावली. परंतु विरोधी पक्षांना कधीही यश मिळू शकले नाही. यावेळी सत्ताधारी भाजपने थेट पवारांच्या घरातच फूट पाडली. त्यामुळे आता शरद पवार यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना विजयी करण्यासाठी शरद पवार यांनी या वयातही दंड थोपटले आहेत. खरे म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विधानसभेचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे जाळे त्यांच्यासोबत आहे. त्याच्या जोरावर अजित पवार यांनी खासदार सुपिया सुळे यांच्यासमोर आव्हान उभे करण्याची योजना आखली आहे. त्यात अजित पवारांना महायुतीची साथ आहे. कारण बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचेच दत्ता भरणे आमदार आहेत. दौंडमध्ये भाजपचे राहुल कुल आणि खडकवासलामध्येही आमदार भीमराव तापकीर भाजपचेच आहेत. त्यामुळे बारामतीसह इंदापूर, दौंड, खडकवासलामधून महायुतीला लीड मिळाल्यास अजित पवार गटाच्या उमेदवाराचा सहज विजय होऊ शकतो, असा अजित पवार यांचा अंदाज आहे. दुसरीकडे, या सर्वच मतदारसंघात तळागाळापर्यंत शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यात पुरंदरमध्ये आमदार संजय जगताप आणि भोरमध्ये आमदार संग्राम थोपटे हे मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांचीही ताकद सुप्रिया सुळे यांना मिळू शकते. यासोबतच शरद पवार यांनी आणखी एक डाव खेळण्याची योजना आखली आहे. यामध्ये रासप नेते महादेव जानकर यांना महाविकास आघाडीसोबत घेऊन त्यांना माढ्यातून उमेदवारी देत ताकद दिली जाऊ शकते. त्यादृष्टीने सध्या हालचाली सुरू झाल्याचे समजते.

रासप आघाडीसोबत येणार?

२०१४ मध्ये रासप नेते महादेव जानकर यांनी बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते. त्याच जानकर यांना शरद पवार यांनी सोबत घेण्यासाठी योजना आखली आहे. जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची संख्या मोठी आहे. त्यामुळे जानकर यांनी शरद पवारांना साथ दिल्यास या मतदारसंघात शरद पवार यांची ताकद वाढू शकते. त्यामुळे थेट शरद पवार यांनीच जानकर यांना ऑफर दिली असून, त्यासाठी जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघात पाठिंबाही दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. शरद पवार यांचा हा डाव यशस्वी झाल्यास महायुतीचे मनसुबे उधळले जाऊ शकतात, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

logo
marathi.freepressjournal.in