शरद पवार यांचा आरोप: भाजपकडून जनतेची फसवणूक; देशात भाजपला अनुकूल स्थिती नाही

संसदेत प्रश्न विचारला म्हणून १४६ खासदारांना निलंबित केले. बेरोजगारी, महागाई हे सर्वसामान्य नागरिकांचे विषय आहेत.
शरद पवार यांचा आरोप: भाजपकडून जनतेची फसवणूक; देशात भाजपला अनुकूल स्थिती नाही

राजा माने / मुंबई, शिर्डी : भाजपने सत्ता येण्याअगोदर आणि आल्यावर अनेक घोषणा केल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, अशी घोषणा केली. परंतु, प्रत्यक्षात काहीच झाले नाही. तसेच शहरी भागातील लोकांना घरे देण्याचे आश्वासनही पूर्ण केलेले नाही. एखाद्या धोरणाबाबत अशी मांडणी केली जाते की, सर्व जण थक्क होऊन जातात. मात्र, प्रत्यक्षात भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. आता हे लोकांच्या लक्षात आले आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला. दक्षिण भारतासह अनेक राज्यांत भाजप नाही. मग ४०० पेक्षा जास्त जागा कुठून आणणार, असा सवाल उपस्थित करीत देशात भाजपला अनुकूल स्थिती नाही, असेही पवार म्हणाले.

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय शिबीर पार पडले. या शिबिराच्या समारोपप्रसंगी शरद पवार यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मागच्या काही दिवसांपासून पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात अस्वस्थता होती. या सर्वांच्या मनात पक्षीय विचार पक्का करण्याच्या दृष्टिकोनातून हे शिबीर घेण्यात आले. भाजप २०२४ मध्ये ४५० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळविण्याचा दावा करीत आहे. मात्र, देशात भाजपची लोकप्रियता राहिलेली नाही. मुळात बऱ्याच राज्यांत भाजपची सत्ता नाही. अनेक राज्यांत भाजपची स्वबळावर सत्ता नाही. गोव्यात काँग्रेसचे सरकार होते, तिथे आमदार फोडण्यात आले आणि तेथे सत्ता स्थापन केली. केवळ सत्तेच्या जोरावर प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. एकीकडे सत्ता आणि दुसरीकडे प्रचार यंत्रणा प्रभावीरीत्या राबविली जात आहे. त्याच्या जोरावरच भाजप ४५० जागा जिंकण्याचा दावा करीत आहे. मात्र, प्रत्यक्षात देशात भाजपला अनुकूल स्थिती नाही. उलट दक्षिणेतील राज्यांत भाजपला सत्ता मिळविता आलेली नाही. तसेच इतर बऱ्याच राज्यांत भाजपची सत्ता नाही. त्यामुळे त्यांचा दावा चुकीचा आहे. खोटी प्रचार यंत्रणा राबवून ते जागांचे गणित मांडत आहेत, असा आरोप शरद पवार यांनी केला.

संसदेत प्रश्न विचारला म्हणून १४६ खासदारांना निलंबित केले. बेरोजगारी, महागाई हे सर्वसामान्य नागरिकांचे विषय आहेत. गॅस दर ११०० रुपये झाला. अन्नधान्य महाग झाले. आपण आता १४० कोटींच्या पुढे गेलो आहोत. यातील ५४ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. लोकसंख्येचा दबाव वाढत आहे. शेतकऱ्यांची अवस्था चिंताजनक झाली आहे. शेतकऱ्यांचा बोजा कमी करण्यासाठी धोरणे आखण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यावर काम होत नाही, असा आरोपही शरद पवार यांनी केला. भाजप सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे, असेही पवार म्हणाले.

दिल्लीच्या अदृश्य शक्तीविरुद्ध लढत राहणार : सुप्रिया सुळे

राज्यात जनतेचे अनेक प्रश्न आहेत. मात्र, त्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. आज राज्यात पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. तसेच अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडेही सरकार लक्ष देत नाही. आरक्षणाचा प्रश्नही प्रलंबित आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर आमच्या दारात येऊन आम्ही आरक्षण देऊ, असे म्हणत होते. परंतु प्रत्यक्षात आरक्षण दिले गेले नाही. आता मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणाचा मुद्दा जो सोडवेल, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. असे सांगतानाच मी दिल्लीतील अदृश्य शक्तीविरोधात कायम लढत राहीन, असे म्हटले. यावेळी त्यांनी भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी नाते तोडणे सोपे असते, ते निभावणे कठीण असते. असे सांगत त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

प्रचार यंत्रणा हिटलरसारखी

भाजपच्या हातात सत्ता आहे. त्यात प्रचार यंत्रणाही आक्रमक असून, ते हिटलरसारखी ती राबवितात. त्यातूनच ४०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याची भाषा बोलली जात आहे. मात्र, देशात भाजपला अनुकूल स्थिती नाही. कारण सरकारने जनतेला दिलेले कुठलेही आश्वासन पूर्ण केलेले नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला.

शेतकऱ्यांची स्थिती चिंताजनक

सरकारने शेतकरी प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. एका बाजूने शेतीमालाला किंमत द्यायची नाही आणि दुसरीकडे शेतमाल निर्यातीवर बंधने आणायची, असे भाजप सरकारचे धोरण आहे. त्यामुळे शेतकरी आणि जनता अडचणीत आली आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यानेच शेतकरी आत्महत्येत लक्षणीय वाढ झाल्याचे शरद पवार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in