शरद पवार, ठाकरे यांना सहानुभूती; वळसे पाटील यांचे वक्तव्य, भुजबळांचाही दुजोरा

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातही महाविकास आघाडीविरुद्ध महायुतीमध्ये अटीतटीच्या लढती होत आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

विशेष प्रतिनिधी/मुंबई

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातही महाविकास आघाडीविरुद्ध महायुतीमध्ये अटीतटीच्या लढती होत आहेत. एकीकडे महायुतीत सर्व पक्षांनी बळ लावले आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेस नेत्यांनी जोर लावला असून, त्यांनी महायुतीपुढे तगडे आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर आता महायुतीतील नेत्यांमधून प्रतिक्रिया उमटत असून, महायुतीतील बडे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना राज्यात सहानुभूती मिळत आहे, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. थेट महायुतीतील नेत्यांनीच हे मान्य केल्याने महाविकास आघाडी राज्यात बाजी मारणार का, अशी चर्चा रंगली आहे.

राज्यातील महायुती सरकारमधील ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील लोकसभा निवडणुकीत कुठेही प्रचारात दिसले नाहीत. ते घरात पाय घसरून पडल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे प्रचारात ते कुठेही दिसले नाहीत. मतदानाच्या दिवशीदेखील त्यांना व्हीलचेअरवर आणावे लागले. त्यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी राज्यात महायुती बाजी मारेल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, महाविकास आघाडीबद्दल बोलताना त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना राज्यात सहानुभूती मिळत असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर लगेचच ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी वळसे पाटील यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. वळसे पाटील आता बोलत आहेत, मी तर तीन आठवड्यापूर्वीच सांगितले होते. त्यांच्या सभांना खूप गर्दी होत आहे. त्यामुळे वळसे पाटील यांच्या विधानात तथ्य आहे, असेही भुजबळ म्हणाले. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीतच महायुतीच्या नेत्यांनी पवार, ठाकरे यांच्यामागे सहानुभूतीची लाट असल्याचे मान्य करणे म्हणजे एका अर्थाने महायुती बॅकफूटवर गेल्याचे मान्य करण्यासारखेच असल्याचे बोलले जात आहे.

महायुतीत धुसफूस सुरूच

महायुती म्हणून भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आले असले तरी कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांच्यातील मतभेद उफाळून येत आहेत. नाशिकमध्ये छगन भुजबळ, नरहरी झिरवळ महायुतीतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. मात्र, त्यांच्या भूमिकेबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाचे नाशिक जिल्ह्यातील आमदार सुहास कांदे यांनी तर थेट भुजबळ यांच्यावर निशाणा साधत ते दिंडोरीत तुतारीचा प्रचार करीत असल्याचा आरोप केला. त्यानंतर भुजबळ यांनीही कांदे यांना सुनावले. त्यामुळे ही धुसफूस महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी ठाकरेंना लक्ष्य करण्यावरून भुजबळांचा घरचा आहेर

दरम्यान, सोमवारी बसलेल्या वादळाच्या तडाख्यात मुंबईतील घाटकोपर भागातील होर्डिंग्ज पडल्याने जवळपास १४ जणांचा बळी गेला. याला थेट उद्धव ठाकरे हेच जबाबदार असल्याचा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला. यासोबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केले. त्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र, थेट उद्धव ठाकरे यांची बाजू घेतली. राज्यात आपले सरकार आहे. तसेच मुंबई महापालिका राज्य प्रशासनाच्या हातात आहे, असे असताना यामध्ये उद्धव ठाकरे यांचा संबंध काय, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. भुजबळांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात महायुती म्हणून सर्व नेते एकत्र आले असले तरी त्यांच्यात समन्वय नसल्याचेच चित्र पाहायला मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in