शरद पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टर प्रवास घडवला; विनोद तावडेंचे प्रत्युत्तर

अमित शहा यांच्या टीकेला राष्ट्रवादी (श.प.) काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी खोचक प्रत्युत्तर दिले होते.
शरद पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टर प्रवास घडवला; विनोद तावडेंचे प्रत्युत्तर
Published on

नवी दिल्ली : अमित शहा यांच्या टीकेला राष्ट्रवादी (श.प.) काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी खोचक प्रत्युत्तर दिले होते. शरद पवारांची टीका जिव्हारी लागल्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीही पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टर प्रवास घडविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा दहशतवादाच्या एन्काऊंटरप्रकरणी तडीपारी बरी’ असा टोला तावडे यांनी पवारांना लगावला.

“दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीनसारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटरमध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती! दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारे नाही. हे बहुधा माननीय पवारसाहेब विसरले आहेत,” असे तावडे यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

“दोन जन्मठेपेची, काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवारसाहेबांनी हेच वक्तव्य केले असते का? श्रद्धेय अटलजी, अडवाणीजी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात १७ महिने तुरुंगात होते, ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधान झाले, त्यांच्याविषयीदेखील हेच म्हटले असते का? हे पवारसाहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितले पाहिजे,” असेही तावडे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in