शरद पवारांचे भाजपसोबत जाण्याचे पहिले पाऊल पडले; वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा दावा

पवार काका-पुतणे एकत्र आले आहेत, याचा अर्थ त्यांचे विलीनीकरण झाले असून शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचे हे पहिले पाऊल टाकले आहे, अशी टीका वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर (संग्रहित छायाचित्र)
प्रकाश आंबेडकर (संग्रहित छायाचित्र)
Published on

पुणे : पवार काका-पुतणे एकत्र आले आहेत, याचा अर्थ त्यांचे विलीनीकरण झाले असून शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचे हे पहिले पाऊल टाकले आहे, अशी टीका वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथे दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र आणण्याची किमया साधली आहे. नुकत्याच बारामतीत झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील जवळीक पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आली. या पार्श्वभूमीवर आंबेडकर म्हणाले की, शरद पवार जे बोलतात, त्याच्या नेमकी उलट कृती करतात आणि त्यांचे हे मापदंड पुन्हा एकदा तंतोतंत खरे ठरले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी काँग्रेसलाही सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राज ठाकरे आहेत. त्यामुळे राज ठाकरे ज्या ज्या पक्षांसोबत युती करतील, त्यांच्यासोबत काँग्रेसने जाऊ नये. जर काँग्रेसने हे पाळले नाही, तर महाराष्ट्राप्रमाणेच देशभरात त्यांचे अस्तित्व कमी होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

आगामी निवडणुकांबाबत बोलताना आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने आम्ही त्यांच्याशी आघाडी केली आहे. इतर महानगरपालिकांमध्ये भाजपला वगळून इतर पक्षांशी आघाडी करण्याबाबत बोलणी सुरू आहेत.

मात्र, ज्या ठिकाणी बोलणी यशस्वी होणार नाहीत, त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार?

राज्याच्या राजकारणात सध्या अशी चर्चा सुरू आहे की, केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद दिले जाईल आणि राज्यामध्ये अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे पूर्ण अधिकार सोपवले जातील. बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, जर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या, तर सेक्युलर मतदारांनी त्याचे आश्चर्य वाटून घेऊ नये, असा टोला त्यांनी लगावला आहे.

logo
marathi.freepressjournal.in