शरद पवार गटातील बडा नेता भाजपमध्ये जाणार का? पाटील यांनी चर्चांना लावला पूर्णविराम, म्हणाले...

शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
शरद पवार गटातील बडा नेता भाजपमध्ये जाणार का? पाटील यांनी चर्चांना लावला पूर्णविराम, म्हणाले...
Published on

आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी येत्या काही महिन्यांतच सुरु होणार असून राज्यासह देशभरात राष्ट्रीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झालीय. भारतीय जनता पक्षात इतर राजकीय पक्षातील नेत्यांचं इनकमिंग सुरु झालंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे राज्यात राजकीय उलथापालथ झालीय. तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्यानं राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात खळबळ उडाली होती. परंतु,राष्ट्रवादीचा काँग्रेसचा (शरद पवार गट) बडा नेता भाजपच्या गळाला लागणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. भाजपात प्रवेशाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना महत्त्वाचं विधान केलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

" मी पक्ष सोडून कुठेच जाणार नाही आणि कुणी येणारही नाही. माझ्या नावाची चर्चा असेल तर चांगलंच आहे. मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाल्यावर लोकांपर्यंत पोहोचता येतं," अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलीय. नुकत्याच झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता.

या अधिवेशनाची सांगता होताच शरद पवार गटातील बडे नेते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. शरद पवार गटातील बडा नेता कोण? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोण नेता भाजपच्या वाटेवर आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला होता. पण आता मात्र खुद्द जयंत पाटील यांनीच मौन सोडलं असून मी भाजपात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.

logo
marathi.freepressjournal.in