माझे वय काढत बसू नका, हा गडी थांबणारा नाही! शरद पवारांचा विरोधकांना सूचक इशारा

विधानसभा, लोकसभा, राज्यसभा या तिन्ही ठिकाणी काम करताना मी मागील ५६ वर्षांत एक दिवसाचीही सुट्टी घेतलेली नाही. शेतात काम करणाऱ्या बैलालाही पोळ्याच्या दिवशी सुट्टी असते. मी राजकीय जीवनात सुट्टीपासून कायम दूरच राहिलो, असे शरद पवार यांनी सांगितले.
माझे वय काढत बसू नका, हा गडी थांबणारा नाही! शरद पवारांचा विरोधकांना सूचक इशारा

पुणे : विरोधक म्हणतात यांचे वय आता ८२, ८४ झाले. आता काय त्यांच्यावर अवलंबून राहायचे. भाषणात मी ८४ वर्षांचा योद्धा असल्याचे सांगितले गेले. परंतु माझे सांगणे आहे की, माझे वय काढत बसू नका. हा गडी थांबणारा नाही, असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी सोमवारी विरोधकांना दिला.

विधानसभा, लोकसभा, राज्यसभा या तिन्ही ठिकाणी काम करताना मी मागील ५६ वर्षांत एक दिवसाचीही सुट्टी घेतलेली नाही. शेतात काम करणाऱ्या बैलालाही पोळ्याच्या दिवशी सुट्टी असते. मी राजकीय जीवनात सुट्टीपासून कायम दूरच राहिलो, असे शरद पवार यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उंडवाडी कडेपठार येथे दुष्काळी दौरा करून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात मी १९६५ पासून केली. कॉलेजमधून बाहेर पडल्यावर या परिसरात काम करण्याची इच्छा होती. त्यानुसार दुष्काळी भागात पाणी वाचविण्यासाठी काम करू लागलो. सुमारे ३०० तलाव त्याकाळी तयार झाले व जे काही पाणी पावसाळ्यात पडले, ते साठवले गेल्याने काही भाग बागायती झाला व लोकांना एकप्रकारे जगण्याचे साधन मिळाले.

पवार पुढे म्हणाले की, नंतरच्या काळात मी १९६७ मध्ये विधानसभेत गेलो. नंतर राज्यात स्थिती बदलली. कधी मंत्री झालो, कधी मुख्यमंत्री झालो, केंद्र सरकारमध्ये गेलो, देशाच्या संरक्षण खात्यात काम करण्याची संधी मिळाली व मला शेवटची दहा वर्षे कृषी मंत्री म्हणून काम करता आले. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडून मी कृषी खाते मागून घेतले व दहा वर्षे कृषी खात्याचे काम माझ्याकडे आले. त्यावेळी शेतकऱ्यांचे ७१ हजार कोटींचे कर्ज आम्ही माफ केले, व्याजाचे दर कमी केले, नवीन बी-बियाणे दिल्याने देशातील अन्नधान्य उत्पादन वाढले.

नंतरच्या काळात देशातील सत्ता बदलली, लोकशाहीत सरकार येतात, जातात. बारामतीला मी १९७१ साली कृषी विकास प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे ज्ञान मिळविण्यास येतात. विद्या प्रतिष्ठानमध्ये ३५ हजार मुले-मुली आज शिक्षण घेत आहेत. साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेची एकूण ७५ कॉलेज व ३०० हायस्कूल आहेत. त्यात चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी ज्ञानदानाचे काम केले.

दुष्काळाच्या मुद्द्यावरूनही शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. "जनाई-शिरसाई योजनेच्या कामाची जबाबदारी मी ज्यांच्यावर दिली होती, त्यांनी ती पार पाडली नाही. मी गेली २० वर्षे स्थानिक विषयात लक्ष घालत नव्हतो. परंतु, आता लक्ष घालून मी माझी जबाबदारी पार पाडेन. बारामतीच्या जिरायत भागाने नेहमीच मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे या माझ्या माणसांचे प्रश्न सोडवणे ही माझीच जबाबदारी आहे," असे शरद पवार म्हणाले.

आकसाने कारवाई करणे खिलाडूपणाचे लक्षण नव्हे

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी त्यांना केंद्रातील कृषी मंत्री म्हणून प्रचंड मदत केली. मोदींनीही आपले बोट धरून राजकारणात आल्याचे सांगितले. आज तेच पंतप्रधान वेगळी भूमिका घ्यायला लागले आहेत. राजकारणात वेगळ्या विचाराची कुणी भूमिका घेतली, तर त्याच्याबद्दल आकस वा कारवाई करणे, हे खिलाडूपणाचे लक्षण नाही. अशा हुकूमशाहीने देशाचे चित्र बदलेल आणि सत्ता ही मूठभर लोकांच्या हातात जाईल, अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली.

तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही अवलाद आहे!

‘घड्याळाला मतदान केले नाही तर पाणी मिळणार नाही, कारखान्याला ऊस जाणार नाही’, असा मजकूर असलेली चिठ्ठी शरद पवारांनी भरसभेत वाचून दाखवली आणि ‘अशा धमक्यांना घाबरू नका, त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आता आली आहे. कितीही धमक्या द्या, तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही अवलाद आहे’, असे शरद पवार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in