पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लीनिकमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
शरद पवार यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आली. सध्या त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीम तैनात करण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, शरद पवारांना सौम्य डिहायड्रेशनमुळे रुबी हॉल क्लीनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना द्रवपदार्थांची आवश्यकता आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, ते २ दिवस रुबी हॉल क्लीनिकमध्ये राहतील आणि नंतर त्यांना घरी पाठवण्यात येईल.