"माझं मन सांगायचं, बारामतीकर साथ सोडणार नाहीत..."अजितदादांच्या काटेवाडीत शरद पवारांची तुफान फटकेबाजी, मोदींना म्हणाले...

देशातील लोक आम्हा प्रशासन किंवा राजकारणातील लोकांपेक्षा शहाणे आहेत. तुमच्या शहाणपणामुळं देशातील लोकशाही टिकलीय, असं शरद पवार म्हणाले.
"माझं मन सांगायचं, बारामतीकर साथ सोडणार नाहीत..."अजितदादांच्या काटेवाडीत शरद पवारांची तुफान फटकेबाजी, मोदींना म्हणाले...

मुंबई: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार संघर्ष पाहायला मिळाला. या संघर्षात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय झाला, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांचा निवड झाला. लोकसभा निवडणूकीनंतर शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी अजित पवार यांच्या काटेवाडी गावात जाऊन मतदारांचे आभार मानले. काटेवाडीत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. माझं मन सांगायचं की, बारामतीकर माझी साथ कधी सोडणार नाहीत, शेवटी तेच खरं झालं आणि निवडणूकीत यश मिळालं, असं शरद पवार म्हणाले.

यावर्षीची निवडणूक सोपी नव्हती...

शरद पवार म्हणाले की, "यावर्षीची निवडणूक वेगळी होती. देशात कुठंही गेलो की लोक विचारायचे, बारामतीत काय होईल? माझं मन सांगायचं बारामतीकर कधी साथ सोडणार नाहीत. ते मन जे सांगायचं ते खरं झालं आणि निवडणूकीत यश मिळालं. सुप्रियाला तुम्ही चौथ्यांदा निवडून दिलं. सुप्रिया सुळेंची संसदेतील हजेरी ९८ टक्के आहे. लोकसभेत उपस्थित राहून लोकांचे प्रश्न मांडणारी म्हणून त्यांचा लौकीक आहे."

पवार पुढे म्हणाले की, "ही निवडणूक सोपी नव्हती. तुम्हाला माहितीये की, इथल्या निवडणूकीत मी काही फार येत नव्हतो. एकदा नारळ फुटला की, निवडणूक तुमच्या हातात आणि मी महाराष्ट्रभर फिरायचो. यंदाही कमी जास्त प्रमाणात तसंच होतं."

मोदीसाहेब तुम्ही आमच्याकडे जास्त लक्ष ठेवा...

काटेवाडीत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मिश्किल टीका केली. ते म्हणाले की, "यावेळेला एक प्रकारची शक्ती दिल्लीपासून लावली. देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात आले. ज्या अठरा ठिकाणी ते आले, त्यापैकी आठ ते नऊ ठिकाणी एकच विषय होता, शरद पवार.. माझं भाग्य आहे, देशाचा पंतप्रधान निम्म्यावेळेला माझं नाव घेतो. काय साधं सुधी गोष्ट आहे का? कुठंही गेले की ते माझ्याबद्दल बोलत होते. मी एके ठिकाणी सांगितलं, इथून पुढं कुठल्या निवडणूका असतील, तर मोदीसाहेब तुम्ही आमच्याकडे जास्त लक्ष ठेवा. त्यांनी लक्ष ठेवलं, की मत पडतात."

देशातील लोक शहाणी आहे...

शरद पवार यांनी देशातील मतदारांचं कौतुक केलं. ते म्हणाले की, "या देशात लोकशाही आहे. जगातील अनेक ठिकाणी हुकूमशाही आहे. यावेळी हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न होता. पण या देशातील लोक आम्हा प्रशासन किंवा राजकारणातील लोकांपेक्षा शहाणे आहेत. तुमच्या शहाणपणामुळं देशातील लोकशाही टिकलीय. भारताचा जगात लोकशाहीप्रधान देश म्हणून जो लौकीक आहे, तो तुमच्यामुळं आहे. तुम्ही हुकुमशाहीच्या दिशेनं देश कधी जाऊ देणार नाही. "

लोकांचे फलक, आपलं निवडणूकीतील यश...

"लोक म्हणतात, लोकांचे फलक लागले, आपलं काहीच दिसत नाहीत. लोकांचे फलक आपलं निवडणूकीतील यश. तुम्ही फलक कितीही लावा, शेवटी निवडणूकीत मत कुणाला दिलं हे महत्त्वाचं..." असं शरद पवार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in